लोकसभा, विधानसभेच्या पाच जागा जिंकण्याची तयारी करा : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

लोकसभा, विधानसभेच्या पाच जागा जिंकण्याची तयारी करा : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. कोल्हापूर लोकसभेसह विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घ्या. कार्यकर्त्यांनी एक वर्ष पक्षासाठी दिले तर राज्यात राष्ट्रवादीचे सरकार येईल, असा विश्वास आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मार्केट यार्ड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा. घरोघरी संपर्क वाढवा. सर्व संस्था, लोकसभा, विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचा झेंडा फडकाविल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांच्याबद्दल एकेरी बोलणार्‍यांवर भाजप नेतृत्वाने आवर घालावा. पवार यांना दिल्या जाणार्‍या धमक्या सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात किमान सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहन आ. राजेश पाटील यांनी केले. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा यासाठी सर्वांनी झटून कामे केले पाहिजे, असे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले.

यावेळी माजी आमदार राजीव आवळे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रा. किसन चौगुले, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, भैया माने, पंडितराव केणे, राजेश लाटकर, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे आदी उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी आभार मानले. बूथ कमिटी जिल्हा समन्वयक म्हणून विकास पाटील यांची निवड जाहीर केली.

अधिकार्‍यांची मानसिकता बदलली पाहिजे

शासन आपल्या दारी उपक्रमाला शुभेच्छा आहेत. त्यामधून गोरगरिबांची सेवा होणार आहे. परंतु, अधिकार्‍यांची मानसिकता बदलल्याशिवाय शासन नागरिकांच्या दारात जाणार नाही. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिलेले निवेदन गंभीर आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

Back to top button