नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ मोहन जोशी, वंदना गुप्तेंना | पुढारी

नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ मोहन जोशी, वंदना गुप्तेंना

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गोंविद बल्लाळ स्मृतिदिनाचे आयोजन दरवर्षी 14 जून रोजी करण्यात येते. यानिमित्ताने नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या जीवनगौरव पुरस्कारांसाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि आभिनेत्री वंदना गुप्ते यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा नूतनीकरण केलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

14 जून रोजी गोविंद बल्लाळ स्मृतिदिन व पारितोषिक वितरण सोहळा नाट्य परिषद दरवर्षी आयोजित करत असते. परंतु मागील चार वर्षांत कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत. यंदाच्या वर्षी 14 जूनचा कार्यक्रम नूतनीकरण केलेल्या नाट्यसंकुलात दिमाखात साजरा होणार आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मोहन जोशी रंगभूमीवर कार्यरत आहेत. हिंदी, मराठी, भोजपुरी व अनेक भाषेतून त्यांनी 450 पेक्षाही अधिक चित्रपटांतून भूमिका केली आहे. भारत सरकारच्या नाट्य कला अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. जोशी यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून 13 वर्षे काम पाहिले आहे.यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरू झाले. नाट्य परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाटकांबरोबरच अनेक चित्रपट आणि मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले असल्याची माहिती दामले यांनी दिली.

Back to top button