पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड लाचखोरच! | पुढारी

पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड लाचखोरच!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनातील मोबदला प्रकरणात पुण्याचा अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोडने आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्यक्त केला. तसेच डॉ. रामोड हा लाचखोर (हॅबिच्युअल ऑफेंडर) असल्याचे सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत डॉ. रामोडकडे करण्यात आलेल्या चौकशीतून त्याचे निवासस्थान तसेच कार्यालय येथून सहा कोटी 64 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याखेरीज, एक महागडा मोबाईलही जप्त करण्यात आला असल्याची माहिती सीबीआयचे सरकारी वकील अभय आरीकर यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर, सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी डॉ. रामोडला 13 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड याला आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि. 9) पकडले. डॉ. रामोडच्या बाणेर येथील बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे तसेच सहा कोटी 64 लाख रुपयांची रोकड जप्त केली. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यासाठी डॉ. रामोडने लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. रामोडला शनिवारी सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक आय. बी. पेंढारी व त्यांच्या पथकाने विशेष न्यायालयात हजर केले. दरम्यान, रामोड लाचखोर (हॅबिच्युअल ऑफेंडर) असल्याचे सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. तक्रारदार वकील आणि रामोड यांच्यातील संभाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

या संभाषणातून रामोडने पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. संभाषण पडताळणीसाठी रामोडच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्याच्या निवासस्थानात मोठी रोकड सापडली. ही रोकड कोठून आणली, कोणी दिली यादृष्टीने सखोल तपास करायचा आहे. तपासासाठी रामोडला पाच दिवसांची कोठडी मिळावी, अशी विनंती सीबीआयचे वकील अ‍ॅड. अभय अरीकर यांनी न्यायालयात युक्तिवादादरम्यान केली. रामोड याच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.

हेही वाचा

व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल; पारंपरिक शिक्षणाला फाटा

आळंदी : माउलींच्या पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी लगबग

नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ मोहन जोशी, वंदना गुप्तेंना

Back to top button