

सोमेश्वरनगर(पुणे) : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यातच तो लहानपणापासून दोन्ही पायांनी अपंग, आई-वडील दुसर्याच्या शेतात राबणारे, लहान बहिणीने सायकलवर नेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतलेले प्रचंड कष्ट आणि मित्रांची तसेच समाजसेवकांची त्याच्या शिक्षणाला मिळालेली साथ सार्थ ठरवत तब्बल सहा वर्षे त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा देत अखेर यशाला गवसणी घातलीच.
ही कहाणी आहे होळ-साळोबावस्ती (ता. बारामती) येथील दोन्ही पायांनी अपंग असणार्या ज्ञानेश्वर पांडुरंग मदने याची. जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात अपंग प्रवर्गातून सहावा येत मंत्रालयातील लिपिकपदाला त्याने गवसणी घातली. त्याने मिळविले यश हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
मित्रांचा लाडका असलेला माऊली लहानपणापासून शाळेत हुशार होता. आई-वडील शेतमजूर, डोक्यावर गवताचे छप्पर असणार्या माऊलीला लहानपणापासून शिकण्यात गोडी होती. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा साळोबावस्ती येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल वाणेवाडी या ठिकाणी झाले. वाणेवाडी शाळेत असताना लहान बहीण मुक्ताईने वयाने मोठ्या असलेल्या ज्ञानेश्वराला सायकलच्या कॅरेजवर बसवून आणत पाचवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाची साथ लाभली. सोमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले.
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातून बी. एस्सी.चे (केमिस्ट्री) शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि संचालक राजवर्धन शिंदे यांची मोलाची साथ मिळाली. सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक गणेश सावंत यांनी त्याच्या पाठीशी उभे राहत मोफत शिक्षणासाठी मदत केली.
2021 मध्ये मंत्रालय लिपिकपदासाठी परीक्षा दिली होती. यात माऊलीने यश मिळविले. टंकलेखन परीक्षेसाठी शेतकरी संघटनेचे नेते सतीश काकडे यांनी,तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी उद्योजक संतोष कोंढाळकर यांनी आणि एमएससीआयटी कोर्ससाठी योगेश सोळस्कर यांनी सहकार्य केले. या यशात आई-वडील, लहान बहीण, सोमेश्वर परिसरातील शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, शेकडो मित्रांची साथ मोलाची ठरल्याचे मत माऊलीने व्यक्त केले.
आळंदीचे सामाजिक कार्यकर्ते डी. डी. भोसले आणि विलास काटे यांनी माऊलीला सन 2012-13 मध्ये नवीन तीनचाकी घेऊन दिली आणि तीच त्याची जीवनसाथी बनली आहे. ही सायकल अनेक सुख-दुःखांची साक्षीदार बनली आहे.
हेही वाचा