लालपरीचं चांगभलं ! पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ, तर प्रवासी पाचपट वाढले | पुढारी

लालपरीचं चांगभलं ! पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ, तर प्रवासी पाचपट वाढले

प्रसाद जगताप

पुणे :  जनसामान्यांच्या वाहतुकीचा आधार असलेली, ‘रस्ता तिथे एसटी’ हे ब्रीद घेऊन अविरत सेवेत असलेल्या एसटीला ज्येष्ठ अमृत योजना, महिला सन्मान योजनेमुळे सुगीचे दिवस आले आहेत. शासनाकडून मिळत असलेल्या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी, पुणे विभागाच्या उत्पन्नात चौपट वाढ झाली आहे, तर प्रवासी संख्या पाचपटीने वाढली आहे. वय वर्ष 75 व त्या पुढील वयाच्या नागरिकांसाठी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून “अमृत मोफत प्रवास” योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली “महिला सन्मान” ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरू केल्या.
या योजनांना  उत्तम प्रतिसाद मिळत असून, महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे.   एसटीच्या पुणे विभागाच्या मासिक उत्पन्नात चारपटीने वाढ झाली आहे. जुलै 2022 या महिन्यात पुणे विभागाच्या तिजोरीत 4 कोटी 38 लाख 19 हजार 360 रुपये  जमा झाले होते.  तर यंदा जुलै 2023 या महिन्यात यात चारपटीने वाढ होऊन 16 कोटी 52 लाख 95 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

जून महिन्यात 29 लाख जनांचा प्रवास

 एसटीच्या पुणे विभागातून जुलै 2022 या महिन्यात 5 लाख 73 हजार 549 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर यंदाच्या जुलै 2023 या महिन्यात 29 लाख 50 हजार 666 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. यावरून एसटीच्या मासिक प्रवाशांमध्ये पाचपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
समाजाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठ व महिलांसाठीच्या योजनेमुळे उत्पन्नात भर पडली. प्रवासीही वाढले आहेत. अधिकारी-कर्मचार्‍यांचाही उत्साह वृद्धिंगत होत असून, एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे.
– सचिन शिंदे,
विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

Back to top button