

मुंबई; पुढारी ऑनलाईन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी एसटी कृती समितीची परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहावे, असे आवाहन एसटी कृती समितीने केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीग्रुह येथे एसटी कृती समितीची बैठक झाली. यात ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फी पर्यंतची कारवाई करण्यात आलेली नाही. अशा (सुमारे ५५ हजार कर्मचारी) कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे! त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार कृती समितीमधील संघटनांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.
चर्चा करुन मार्ग काढायचा असेल तर एसटी सुरु करा. कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विलिनीकरणाची लढाई सुरुच राहील. पण त्यांनी अगोदर कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटी कृती समितीने केले आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यापैकी अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर काहींना बडतर्फीच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. कर्मचारी कामावर न परतल्याने राज्यातील अनेक भागात एसटीची सेवा अगदी कमी प्रमाणात आहे. यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे ही वाचा :