एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना वेतन नसल्‍याने कुटुंबीय हवालदिल | पुढारी

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना वेतन नसल्‍याने कुटुंबीय हवालदिल

बीड ; पुढारी वृत्‍तसेवा

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी कर्मचारी संपावर आहेत. जे कर्मचारी अजूनही संपात सहभागी झाले आहेत, त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यापैकी अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर काहींना बडतर्फीच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी या कारवाईचे आपल्या कुटुंबियांना कळू दिलेले नाही. अन्यथा त्यांच्या उरल्यासुरल्या अशाही मावळतील.

त्यामुळे कुटुंबीयांना सांगावे कसे, अशा विंवेचनात रोज हे कर्मचारी घराबाहेर पडत आहेत. संपातून काहीतरी चांगलं होईल, याच आशेवर ते कुटुंबीयांना दिलासा देत आहेत; परंतु कारवाई झाली म्हटल्यावर कोणत्या तोंडाने कुटुंबीयांच्या समोर जावे संप संपला तरी आम्ही काय करावे या विचाराने कर्मचाऱ्यांना रात्र-रात्र झोप येत नसल्याचे गेवराई येथील कर्मचारी दै. पुढारीशी बोलताना सांगतात पगार नाही; त्यामुळे घरातील एक-एक दिवस मोठ्या कष्टाने काढावे लागत आहेत.

मुलाचा हट्ट देखील पुरविता येणार नाही. औषध-पाणी, किराणा, रोजचा भाजीपाला मिळण्यासाठी रोजचा संघर्ष सुरू झाला आहे. जीवनाची गाडी थांबल्याची भावना कर्मचाऱ्यांनी दै पुढारी जवळ व्यक्त केली. सांगा कसं जगाव या ओळी तोंडी पुटपुटत दिवस कंठत असल्‍याचे चित्र गेवराई आगारातील कर्मचारी वर्गाच आहे.

नोकरीची शाश्वती मिळावी याचसाठी संप सुरू करण्यात आला. मात्र नोकरीच आता धोक्यात आली आहे. महामंडळाने कारवाई केल्यामुळे सारेच अंधकारमय वाटत आहे. परंतु लढण्याची तयारी आहे. म्हणूनच या दुखवट्यामध्ये ठाम आहोत. त्‍यामुळे एसटी बस बरोबरच जीवनाचीही गाडी थांबली आहे. याच्या काय यातना होतात हे आम्हालाच माहीत.

-सेवा समाप्त कर्मचारी

राज्य शासनाने मनात आणले तर निश्चितच मार्ग निघेल; परंतु इच्छाच नसल्याने हा संप, दुखवटा लांबला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी योग्य आहे. ती जगावेगळी नव्हे कारण इतर राज्यात एस.टी.ची जबाबदारी राज्य शासनाची आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकाराने तसे नियोजन करावे, इतकेच आमचे म्हणने आहे. आम्हांला उपाशी ठेवून काय मिळणार आहे.

-बडतर्फ कर्मचारी

मकरसंक्रांतचा सण जवळ आला तरी देखील आम्हाला वेतन नाही. सणासुदीच्या काळात आम्हांला सण कसा गोड वाटणार.

-महिला वाहक

Back to top button