निवृत्त चालकाच्या हाती आता एसटीचे स्टेअरिंग | पुढारी

निवृत्त चालकाच्या हाती आता एसटीचे स्टेअरिंग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंतरिम वेतनवाढ,निलंबन-बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचार्‍यांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. तसेच खासगी कंपन्याकडून कंत्राटी चालक मागविण्यासाठीदेखील महामंडळाने जाहिरात काढली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्‍ने यांनी दिली.

73 दिवसांपासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. कर्मचार्‍यांना राज्य सरकारने वेतनवाढ देऊ केली तरीदेखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

संपकाळात 250 आगारांपैकी 150 ते 170 आगार सुरू झाले असले तरी कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या खूपच कमी असल्याने राज्यातील एसटीची वाहतूक ठप्पच आहे. एसटीची वाहतूक बंद असल्याने खासकरून राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहे.त्यामुळे महामंडळाने राज्यातील 31 विभागांतील निवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना करार पद्धतीने कामावर घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

1 हजार 144 कर्मचारी बडतर्फ

महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. मंगळवारी 221 कर्मचार्‍यांना बडतर्फ केल्याने आतापर्यंत बडतर्फ केलेल्यांची संख्या एक हजार 144 झाली आहे, तर 11 हजार 24 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या 2 हजार 754 झाली आहे.

वाहतुक सुरू करण्यासाठी दोन्ही पर्यायांचा विचार

आजही मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यातील एसटीची वाहतूक सुरू करणे आवश्यक आहे.त्यासाठी महामंडळातून निवृत्त झालेले आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले जे चालक कामावर येण्यास उत्सुक आहेत,त्यांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंत्राटी पद्धतीनेदेखील चालक घेण्यात येणार आहेत.

कळंब आगारात कर्मचार्‍याला संपकर्‍यांकडून मारहाण

मंगळवारी कळंब आगाराचे वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार हे आगारात कर्तव्य बजावत असताना संपकरी कर्मचारी डी.एम.मुंडे, एम.एम.मुळीक आणि ए.व्ही.चौधरी यांनी संप सुरू असताना एसटी आगाराच्या बाहेर का काढता, असे म्हणत कुंभार यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी योजना काय

इच्छुक कर्मचार्‍यांना वयाची 62 वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक हवा.महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघात केलेले नसावेत.तसेच कर्मचारी हा बडतर्फ किंवा सेवामुक्त झालेला नसावा. चालकाकडे अवजड वाहन चालन परवाना वैध आणि पी.एस.व्ही बिल्ला असणे आवश्यक आहे.

कर्मचार्‍याला दिवसाला 769 म्हणजेच महिन्याला 20 हजार रुपये (मासिक 26 दिवसांकरिता) पगार देण्यात येईल. कोणतेही भत्ते व इतर लाभ देय राहणार नाही. इच्छुक चालक ज्या विभागातून निवृत्त झाले आहेत,त्या विभागात करारपद्धतीवर अर्ज करू शकतात. महामंडळास आवश्यकता भासल्यास त्यांची नजीकच्या विभागात नियुक्ती करण्यात येईल.

आज हायकोर्टात सुनावणी

एसटीचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज बुधवार 5 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे, या सुनावणीकडे महामंडळासह कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button