

Yuzvendra Chahal vaping viral video
आयपीएल सामन्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे प्रकरण ताजे असतानाच युझवेंद्र चहलही याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो विमानामध्ये 'व्हेपिंग' ( ई-सिगारेट ओढणे) करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या प्रकारावर सोशल मीडिया युझर्सनी चहलवर टीकेची झोड उठवली आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पंजाब किंग्सचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल विमानात प्रवास करताना 'व्हेपिंग' (ई-सिगारेट ओढणे) करत असल्याचा दावा केला जात आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चहल त्याच्या हातातील एका वस्तूवाटे काहीतरी ओढताना दिसत आहे. ती वस्तू नेमकी काय आहे, हे स्पष्टपणे दिसत नाहीये. मात्र, श्वास आत घेतल्यावर चहल धूर सोडताना दिसत आहे. यावेळी त्याच्या शेजारी क्रिकेटपटू शशांक सिंग बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र चहल पंजाब किंग्सच्या (PBKS) संघासोबत प्रवास करत असतानाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी चहलवर टीकेची झोड उठवली आहे. अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, "अशा प्रकारे विमानात धुम्रपान करून तो सर्वांचा जीव धोक्यात घालत आहे." नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाईची मागणीही केली जात आहे.
विमानातील प्रवासात कोणत्याही प्रकारचे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. 'इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा, २०१९' नुसार भारतामध्ये 'व्हेप' किंवा ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग देखील आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये व्हेपिंग करताना पकडला गेला होता. याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करत त्याच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली होती आणि त्याच्या नावावर एक 'डिमेरिट पॉईंट' देखील नोंदवण्यात आला होता. आता चहलच्या या व्हिडिओवर बीसीसीआय (BCCI) किंवा पंजाब किंग्स व्यवस्थापन काय भूमिका घेणार, याची चर्चा सुरु झाली आहे.