

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना बुधवार (दि. 11)पासून सुरू होत आहे. द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ एकमेकांना भिडतील. हा महामुकाबला जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवणार आहे. ऐतिहासिक ‘लॉर्ड्स’ मैदानावर 15 जून पर्यंत रंगणा-या या किताबी लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे द. आफ्रिका संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली असून, ते मानाच्या गदेवर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे, तर द. आफ्रिकेच्या संघाची धुरा टेम्बा बावुमा सांभाळणार आहे. हा अंतिम सामना म्हणजे बावुमाच्या नेतृत्त्वाची एकप्रकारे ‘कसोटी’च असेल. कमिन्सच्या कांगारूंसमोर आफ्रिकन संघ किती कडवे आव्हान उभे करेल, याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या निर्णायक सामन्यात काही प्रमुख खेळाडूंमधील ‘कांटे की टक्कर’ टक्कर अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
WTC Final मध्ये अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा आणि द. आफ्रिकेचा भेदक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यातील लढत पाहण्यासारखी असेल. द. आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या रबाडाचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या ख्वाजाला लवकरात लवकर तंबूत धाडण्याचे असेल. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत 14 कसोटी डावांमध्ये सामना झाला आहे. त्यात रबाडाने ख्वाजाला 5वेळा आपली शिकार बनवले आहे. ही आकडेवारीच या दोघांमधील तीव्र स्पर्धा दर्शवते.
द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉनच्या फिरकीपासून सावध राहावे लागणार आहे. WTC 2023-25 च्या हंगामातील सुरुवातीच्या 6 पैकी 5 कसोटी सामने मुकलेला असूनही बावुमाने 60.90 च्या प्रभावी सरासरीने 609 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, लियॉनने बावुमाला 12 कसोटी डावांमध्ये 4 वेळा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. कर्णधाराच्या खेळीवर संघाची मदार असताना, लियॉनचा सामना करणे बावुमासाठी मोठे आव्हान असेल.
द. आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांच्यातील लढतही लक्षवेधी ठरेल. यान्सेनने या डब्ल्यूटीसी हंगामात एकूण 29 बळी घेत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तर, स्टीव्ह स्मिथने श्रीलंका दौऱ्यावर दोन शतके झळकावत आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. यान्सेनचा वेग आणि स्विंग स्मिथच्या तंत्राची परीक्षा घेईल, यात शंका नाही.
टेम्बा बावुमा आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्यातील लढत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेईल. आकडेवारीवर नजर टाकल्यास, बावुमाने हेझलवूडच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 118 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या असून, दोन वेळा बाद झाला आहे. यादरम्यान, त्याची सरासरी केवळ 23.0 इतकी आहे. हेझलवूडने ऑफ स्टंपबाहेर सातत्यपूर्ण आणि टिच्चून केलेला मारा बावुमाला वारंवार अडचणीत टाकतो. त्यामुळे आफ्रिकन कर्णधाराला अनेकदा धावा काढण्यासाठी धोका पत्करावा लागतो. पण जर बावुमा सुरुवातीचा दबाव झेलू शकला आणि हेझलवूडचा मारा निष्प्रभ करण्यात यशस्वी झाला, तर द. आफ्रिकेला भक्कम सुरुवात मिळू शकते. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष अंतिम निकालावर मोठा परिणाम करू शकतो.
एडन मार्करम आणि पॅट कमिन्स यांच्यातील संघर्ष चुरशीचा ठरणार आहे. कमिन्सने मार्करमला 123 चेंडूंमध्ये चार वेळा बाद केले आहे. यादरम्यान त्याने फक्त 90 धावा दिल्या आहेत. त्यामुळे मार्करमचा कमिन्सविरुद्धची सरासरी केवळ 22.5 इतली आहे. कमिन्सला नेमके माहित आहे की, ऑफ स्टंपबाहेर थोड्या लांबीवर चेंडू टाकून मार्करमला अडचणीत कसे टाकायचे. मार्करमची ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर खेळण्याची सवय त्याच्यासाठी वारंवार घातक ठरली आहे. मात्र, या निर्णायक सामन्यात जर मार्करमने सुरुवातीला कमिन्सचा मारा यशस्वीरित्या तोंड दिले, तर दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला मोठा दिलासा मिळू शकतो आणि ते अधिक आक्रमकपणे खेळू शकतात.
स्टीव्ह स्मिथची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि रबाडाचा स्फोटक वेग-उसळी यांच्यातील संघर्ष हा कसोटी क्रिकेटमधील अप्रतिम नाट्य आहे. ऑस्ट्रेलियाचा खडकासारखा स्थिर फलंदाज स्मिथ आणि द. आफ्रिकेचा आक्रमक वेगवान गोलंदाज रबाडा यांच्यातील लढत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असते. स्मिथने रबाडाच्या गोलंदाजीवर 262 चेंडूंमध्ये 128 धावा केल्या असून त्याची सरासरी 32.0 इतली आहे. मात्र, रबाडाने त्याला चार वेळा बाद केले आहे. WTC अंतिम सामन्यात, जर रबाडाने स्मिथला झटपट बाद केले, तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची मधल्या फळीला खिंडार पडेल. पण जर स्मिथने रबाडाचा सामना यशस्वीरित्या करून मोठी खेळी केली, तर द. आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर रचला जाऊ शकतो.