

wtc final south africa vs australia new history will be created
क्रिकेटजगताचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान सज्ज झाले आहे. येत्या 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ WTCच्या प्रतिष्ठेची ‘गदा’ जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने प्रथमच WTC फायनलमध्ये धडक मारली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा हा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे हा महामुकाबला अत्यंत रोमांचक होईल यात शंका नाही. भारतीय संघ प्रथमच WTC फायनलचा भाग नसल्याने भारतीय चाहत्यांमध्ये थोडी निराशा असली तरी, या अंतिम लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या WTC फायनलमध्ये कोणताही संघ विजयी झाला तरी, एक नवा इतिहास रचला जाणार आहे. WTCच्या इतिहासात आतापर्यंत दोन अंतिम सामने खेळले गेले आहेत आणि आता तिसरा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. जर द. आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियावर विजय मिळण्यात यशस्वी झाला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला नवा विजेता मिळेल. आतापर्यंत केवळ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनीच WTC चे जेतेपद पटकावले आहे.
यापूर्वी दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 2019-2021 च्या पहिल्या पर्वात न्यूझीलंडने तर 2021-2023 च्या दुस-या पर्वात ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद आपल्या नावे केले.
यंदा ऑस्ट्रेलियाकडे आपले विजेतेपद कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे. जर यावेळेसही ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बनली, तर सलग दोन वेळा हे विजेतेपद जिंकणारा तो पहिला संघ ठरेल. एकंदरीत हा अंतिम सामना क्रिकेटरसिकांसाठी एक पर्वणी ठरणार असून, कोणता संघ नवा इतिहास रचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे द. आफ्रिकेच्या संघाने सलग 7 कसोटी सामने जिंकून WTC 2023-25 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांच्या विजयाची टक्केवारी 69.44 राहिली. ऑस्ट्रेलियाचा संघ 67.54 विजयी टक्केवारीस दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय संघाच्या विजयीची टक्केवारी 50 होते, ज्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानले. याच कारणामुळे टीम इंडियाला सलग तिसऱ्या WTC फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
दक्षिण आफ्रिका संघ :
टोनी डी जॉर्जी, रायन रिकेल्टन, एडन मार्करम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.
ऑस्ट्रेलिया संघ :
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरून ग्रीन, ब्यू वेब्स्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुहनेमन.