

द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC टूर्नामेंट्सच्या नॉकआऊट सामन्यांमधील स्पर्धा ही नेहमीच तीव्र आणि रोमांचक राहिली आहे. विशेषतः . 1999 च्या वनडे विश्वचषक सेमीफायनलपासून ते 2023 च्या विश्वचषकापर्यंत, या दोन संघांमधील लढतींनी क्रिकेट चाहत्यांना अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. आता, 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये या दोन बलाढ्य संघांमधील चौथी नॉकआऊट लढत होत आहे. यावेळी हा सामना कसोटी स्वरूपाचा आणि फायनलचा आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. लॉर्ड्स मैदानावरील ही लढत द. आफ्रिकेसाठी ‘चोकर्स’ हा टॅग पुसण्याची आणि इतिहास रचण्याची संधी आहे.
द. आफ्रिका क्रिकेट संघाने 1888-89 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक मजबूत संघ म्हणून उदयास आला. 1960 च्या दशकात त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले. पण रंगभेद धोरणामुळे 1970 ते 1991 पर्यंत त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात आली. 1991 मध्ये पुनरागमन केल्यानंतर द. आफ्रिकेने अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली. पण ICC टूर्नामेंट्समधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांनी संधी गमावल्या. 1999, 2007 आणि 2023 च्या ODI विश्वचषकांतील सेमीफायनलमधील पराभव आणि 2024 च्या T20 विश्वचषक फायनलमधील भारताविरुद्धची हार यामुळे त्यांचा ‘चोकर्स’ हा टॅग अधिक घट्ट झाला.
WTC च्या तिस-या (2023-25) पर्वाच्या गुणतालिकेत द. आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी राहिला. हा संघ पहिल्यांदाच WTC ची फायनल खेळत आहे. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखालील हा संघ लॉर्ड्सवर 11 ते 15 जून 2025 दरम्यान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कांगारूंनी यापूर्वी 2023 मध्ये भारताला हरवून WTC जेतेपद पटकावले आहे.
द. आफ्रिकेने WTC 2023-25 च्या पर्वात प्रभावी कामगिरी केली. त्यांनी भारताविरुद्ध 1-1 अशी बरोबरी, सेंचुरियन येथे पाकिस्तानविरुद्ध विजय, तसेच वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये विजय मिळवले. न्यूझीलंडविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तरीही त्यांची विजयाची टक्केवारी 69.44 राहिली. ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिले, ज्यामुळे ते फायनलमध्ये पोहोचले. ही कामगिरी त्यांच्या सातत्यपूर्ण खेळाचे आणि संघाच्या संतुलनाचे द्योतक आहे.
द. आफ्रिकेचा संघ संतुलित आहे, ज्यामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. एडेन मार्करम, डेव्हिड मिलर आणि टेम्बा बावुमा यांच्या फलंदाजीवर मोठी जबाबदारी आहे. मार्करमने WTC फायनलपूर्वी आत्मविश्वास व्यक्त केला की, त्यांचा संघ ऑस्ट्रेलियाला हरवून चोकर्सचा टॅग पुसून टाकू शकतो. कागिसो रबाडा आणि मार्को यान्सेन यांचा वेगवान मारा ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. रबाडाने अलीकडेच कसोती क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाजाचा मान मिळवला आहे, ज्यामुळे त्यांच्या गोलंदाजीला धार आली आहे. शिवाय, केशव महाराज सारखा फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
ऑस्ट्रेलिया हा एक अनुभवी आणि यशस्वी संघ आहे. त्यांनी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली 2023 चे WTC जेतेपद जिंकले आहे. त्यांच्याकडे स्टीव्ह स्मिथ, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांसारखे खेळाडू आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवू शकतात. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, पण द. आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांच्या मते, या सामन्यात वेगवान गोलंदाजांपेक्षा फलंदाज आणि रणनीती महत्त्वाची ठरेल. द. आफ्रिकेला त्यांच्या फलंदाजीवर विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी अत्यंत आक्रमक आहे.
आफ्रिकेच्या ‘चोकर्स’ टॅगमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव असेल. माजी प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, हा संघ दबावाखाली चांगली कामगिरी करून WTC फायनल जिंकून इतिहास रचू शकतो. मात्र, यापूर्वीच्या ICC टूर्नामेंट्समधील त्यांच्या चुका, जसे की 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलमधील न्यूझीलंडविरुद्धची हार, त्यांना सावध राहण्याची गरज आहे.
द. आफ्रिकेची कामगिरी त्यांच्या फलंदाजीच्या सातत्यावर आणि गोलंदाजांच्या अचूकतेवर अवलंबून असेल. टेम्बा बावुमा याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतर चुका मान्य केल्या होत्या. यानंतर संघाने आपल्या रणनीतीवर काम केले आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवसांत गोलंदाजांना मदत मिळेल, त्यामुळे द. आफ्रिकेला रबाडा आणि यान्सेन यांच्याकडून विकेट्सच्या अपेक्षा आहेत. फलंदाजीत मार्करम आणि बावुमा यांना मोठी खेळी करावी लागेल, कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या भागीदारी महत्त्वाच्या ठरतील.
1999 चा विश्वचषक सेमीफायनल : एक अविस्मरणीय ‘टाय’
1999 चा वनडे विश्वचषक हा द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या ICC नॉकआऊट लढतीसाठी कायम स्मरणात राहील. एजबॅस्टन येथे झालेला हा सेमीफायनल सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने दिलेले 214 धावांचे लक्ष्य द. आफ्रिकेने जवळजवळ गाठले होते. शेवटच्या चेंडूवर त्यांना 1 धाव हवी होती/ मैदानात लान्स क्लूजनर आणि अॅलन डोनाल्ड होते. शेवटच्या चेंडूवर एक धाव काढण्याच्या नादात डोनल्ड धावबाद झाला. ज्यामुळे सामना टाय झाला. सुपर सिक्स टप्प्यातील निकालांमुळे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला. तर द. आफ्रिकेचे स्वप्न भंगले. या सामन्याने आफ्रिकन संघाला ‘चोकर्स’ हा टॅग मिळवून दिला, ज्याने त्यांचा आजही पाठलाग सोडलेला नाही.
हा सामना साउथ आफ्रिकेच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक होता, कारण त्यांनी सामना जवळजवळ जिंकला होता. शॉन पोलॉक आणि जॅक कॅलिस यांच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 213 धावांवर रोखले होते, पण फलंदाजीतील शेवटच्या क्षणांतील चुकीमुळे त्यांचा पराभव झाला. या सामन्याने द. आफ्रिकेच्या ICC टूर्नामेंट्समधील मानसिक दबाव हाताळण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2007 च्या वनडे विश्वचषकात सेंट लुसिया येथे पुन्हा एकदा द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये आमनेसामने आले. त्यावेळीही ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. आफ्रिकेची फलंदाजी ग्लेन मॅकग्राथ आणि शॉन टेट यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोसळली. ज्यामुळे त्यांना केवळ 149 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज गाठले. या पराभवाने द. आफ्रिकेची आणखी एक ICC स्पर्धा निराशेत संपली.
2023 च्या वनडे विश्वचषकात कोलकाता येथे द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या नॉकआऊट लढतीत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या, ज्यामध्ये डेव्हिड मिलरच्या शतकाचा समावेश होता. पण ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी भेदक गोलंदाजी करत द. आफ्रिकेच्या आशा मावळल्या. ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून हा सामना जिंकला.