

गुवाहाटी : कर्णधार लॉरा वोल्वार्डने एकाकी झुंज देत 143 चेंडूंत केलेल्या अविस्मरणीय 169 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी महिला वन डे विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध 7 बाद 319 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. लॉराच्या या धडाकेबाज खेळीत 20 चौकार व 4 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने लॉरा आणि ताझमिन ब्रिटस् (65 चेंडूंत 45) यांच्यातील 116 धावांच्या भागीदारीमुळे 300 पेक्षा अधिक धावांचा पाया रचला. मात्र, एक्लेस्टनने (44 धावांत 4 बळी) 22 व्या षटकात 2 धक्के देत दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला काहीसा लगाम घातला होता.
त्यानंतर लॉरा व मारिझान कॅप (33 चेंडूंत 42) यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली. एक्लेस्टोनने ही धोकादायक भागीदारी पुन्हा एकदा मोडून काढली. 202 धावांवर 6 गडी बाद झाल्याने, दक्षिण आफ्रिका माफक धावसंख्येपर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. याचवेळी लॉराने आपला खेळ उंचावत संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिच्या खेळीच्या पूर्वार्धात ऑफ-साईडवरील शानदार ड्राईव्हसचा समावेश होता, तर उत्तरार्धात तिचा इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांवर मिडविकेटच्या दिशेने हल्ला लक्षवेधी ठरला.
महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने ३० मार्च २०२२ रोजी वेलिंग्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीत ३ विकेट्सच्या बदल्यात ३०५ धावा केल्या होत्या. तथापि, तो सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ ३७ षटकांत अवघ्या १४८ धावांवर गारद झाला होता आणि ऑस्ट्रेलियाने १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेने उभारलेली ३१९ धावांची ही धावसंख्या विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यांमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी, २०२२ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ५ गडी गमावून ३५६ धावा केल्या होत्या.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात, लॉरा वोलवार्टच्या संघाने शेवटच्या १० षटकांत तब्बल ११७ धावा कुटल्या. महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्यांदा असे घडले आहे की, संघातील दोन सर्वोच्च फलंदाजांच्या धावसंख्येतील फरक १०० हून अधिक राहिला.यापूर्वी, गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध हा फरक १४८ धावांचा होता. तेव्हा लॉरा वोलवार्टने नाबाद १८४ धावा केल्या होत्या, तर मारिजाने कॅप ३६ धावांसह संघाची दुसरी सर्वोच्च स्कोअरर ठरली होती.
दक्षिण आफ्रिकेची ही खेळी अधिक खास ठरली, कारण याच मैदानात महिला विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात त्यांचा संघ केवळ ६९ धावांवर गारद झाला होता आणि त्यांना १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.
षटके ०१-१० : न विकेट गमावता ५८ धावा : रनरेट ५.८०
षटके ११-४० : ५ विकेट गमावून १४४ धावा : रनरेट ४.८०
षटके ४१-५० : २ विकेट गमावून ११७ धावा : रनरेट ११.७०
दक्षिण आफ्रिकन महिला : ५० षटकांत ७ बाद ३१९ (लॉरा वोल्वार्ड १४३ चेंडूंत २० चौकार, ४ षटकारांसह १६९, ताझमिन ब्रिटस् ४५, मॅरिझान ४२, ट्रियॉन नाबाद ३३. सोफी इक्लेस्टोन ४/४४, लॉरेन बेल २/५५)