

हॅमिल्टन : हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने इंग्लंडला ५ गडी राखून नमवत मालिकेवर कब्जा केला.
इंग्लंडने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात धमाकेदार शैलीत केली होती. त्यांनी ३ सामन्यांची टी-२० मालिका १-० अशी जिंकली. मालिकेतील २ सामने पावसात वाहून गेले. तथापि, टी-२० मालिकेतील यश इंग्लंड संघ एकदिवसीय मालिकेत कायम ठेवू शकला नाही. यजमान न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून एकदिवसीय मालिका आपल्या नावे केली.
हॅमिल्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ गडी राखून दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ केवळ १७५ धावांवर तंबूत परतला. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ३४ व्या षटकात ५ गडी गमावून १७६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
अशा प्रकारे न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यापूर्वी किवी संघाने बे ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश संघाला ४ गडी राखून पराभूत केले होते. एकदिवसीय मालिकेत सलग दोन सामने जिंकून न्यूझीलंडने इतिहास रचला आहे.
विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या संघाला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत १२ वर्षांनंतर विजय मिळाला आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धची अखेरची द्विपक्षीय (Bilateral) एकदिवसीय मालिका २०१३ मध्ये परदेशात जिंकली होती. इतकेच नव्हे, तर किवी संघाने आपल्या घरच्या मैदानावरचा १७ वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ देखील संपवला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की, न्यूझीलंडने २००८ नंतर प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही मोठी कामगिरी केली आहे.
दुसरीकडे, या दारुण पराभवामुळे २०१९ च्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाची पोलखोल झाली आहे. एकेकाळी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत मानला जाणारा इंग्लंडचा संघ सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. २०२३ च्या विश्वचषकानंतर तर हा संघ विजयासाठी झगडत आहे. विश्वचषकानंतर इंग्लिश संघाने एकूण २५ सामने खेळले असून, त्यांना फक्त ८ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे, तर १७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या काळात त्यांनी सातपैकी ६ द्विपक्षीय मालिका गमावल्या आहेत. इंग्लिश संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीनपैकी तीन सामने गमावून उपांत्य फेरीत देखील पोहोचू शकला नव्हता.