

भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघावर एक मोठे संकट उभे राहिले आहे. या कारणामुळे टीम इंडियाला मैदानात न उतरताच स्पर्धेतून बाहेर पडावे लागण्याची भीती आहे.
एकीकडे, फॉर्ममध्ये असलेली फलंदाज प्रतिका रावल संघाबाहेर गेल्याने भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता टीम इंडियासमोर आणखी एक मोठी चिंता उभी राहिली आहे, ज्यामुळे भारतीय संघाचे महिला विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी चिंतेचा सर्वात मोठा विषय म्हणजे नवी मुंबईतील हवामान. भारताचा शेवटचा लीग सामनाही याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळला गेला होता. पण तो सामना पावसामुळे रद्द झाला. आता पुन्हा एकदा उपांत्य फेरीपूर्वी नवी मुंबईत पावसाने सर्वांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे, जर पावसाने अडथळा आणला, तर टीम इंडियाला न खेळताच विश्वचषकातून बाहेर पडावे लागू शकते, असे बोलले जात आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ॲक्यू वेदरच्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच बुधवारी, येथे ६० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ मैदान ओले राहू शकते आणि ग्राउंड स्टाफला खूप मेहनत घ्यावी लागेल.
गुरुवारी (सामन्याच्या दिवशी) हवामान अंदाजानुसार, सकाळपासूनच पाऊस पडू शकतो. सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत, म्हणजेच दुपारी २:३० वाजेपर्यंत देखील २०-२५ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ अधूनमधून पाऊस पडत राहू शकतो, ज्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, या विश्वचषक स्पर्धेच्या 'नॉकआऊट' सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, जो ३१ ऑक्टोबर आहे. मात्र, त्या दिवशीही जास्त पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी ८० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता आहे. यामुळे दोन्ही दिवशी खेळ न होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर दोन्ही दिवस खेळ झाला नाही, तर सामन्याचा निकाल कसा लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयसीसी स्पर्धेतील 'नॉकआऊट' सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला जातो. पहिल्या दिवशी पावसामुळे व्यत्यय आल्यास, दुसऱ्या दिवशी सामना जिथे थांबला आहे तिथूनच पुन्हा सुरू केला जातो. कोणत्याही एकदिवसीय सामन्याच्या निकालासाठी किमान २० षटकांचा खेळ होणे आवश्यक असते.
जर दोन्ही दिवस पाऊस सुरू राहिला आणि सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही, तर नियमानुसार, लीग स्टेजमध्ये जास्त सामने जिंकणारी आणि गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेली टीम पुढील फेरीसाठी पात्र ठरते.
या निकषानुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा खूप मागे आहे. भारतीय संघ गुणतालिकेत तीन पराभवांसह ७ गुण घेऊन चौथ्या स्थानावर होता, तर ऑस्ट्रेलियाचा संघ ७ पैकी ६ सामने जिंकून आणि एक सामना रद्द झाल्याने १३ गुणांसह अव्वल स्थानी होता.
या स्थितीत, जर दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल आणि भारतीय संघाला न खेळताच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.