

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे खेळला गेलेला पहिला टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यात पावसामुळे दोन वेळा अडथळा आला. पहिल्यांदा, सामना पाच षटकांच्या समाप्तीनंतर थांबला, पण दोन षटकांची कपात करून तो पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्णयानुसार प्रत्येक डावात १८-१८ षटकांचा खेळ होणार होता.
भारताने ९.४ षटकांमध्ये १ गडी गमावून ९७ धावा केल्या असताना, जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे सामना पुन्हा थांबला. यानंतर, पाऊस सतत सुरू राहिल्यामुळे तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि अखेरीस तो रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
भारतासाठी या सामन्यात शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. खेळ थांबला तेव्हा गिल आणि सूर्यकुमार यांनी ६२ धावांची भागीदारी पूर्ण केली होती. सूर्यकुमार यादव २४ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३९ धावा करून नाबाद राहिला. शुभमन गिल २० चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह ३७ धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी, अभिषेक शर्मा १९ धावा करून बाद झाला, त्याला नॅथन एलिसने बाद केले.
कॅनबेरा मैदानावर पावसाची जोर कमी झाला आहे, मात्र हलका रिमझिम पाऊस अजूनही सुरू आहे. खेळपट्टीचा परिसर कव्हर्सने झाकलेला असल्याने षटकांची कपात होणे निश्चित आहे.
सामन्याच्या ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यासह खेळाडूंनी मैदान सोडले. कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली बॅट स्वेटरमध्ये लपवली. आता जोरदार पाऊस पडत आहे. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर (गेल्या ४.४ षटकांत) गिल आणि सूर्याने ५४ धावा फटकावल्या.
भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १५० षटकार पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ मुहम्मद वसीमने (६६ डाव, १५४३ चेंडू) सूर्यकुमार यादवपेक्षा (८६ डाव, १६४९ चेंडू) कमी डावांमध्ये १५० षटकारांचा टप्पा गाठला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० हून अधिक षटकार मारणारे खेळाडू
रोहित शर्मा : २०५
मुहम्मद वसीम : १८७
मार्टिन गप्टिल : १७३
जोस बटलर : १७२
सूर्यकुमार यादव : १५०*
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५० धावांचा टप्पा पार केला आहे. ६ षटकांच्या समाप्तीनंतर भारताने १ गडी गमावून ५३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.
कॅनबेरा येथे (मैदानावर) सुरू असलेल्या सामन्यादरम्यान पावसाने उसंत घेतली आहे. पाऊस थांबल्यामुळे पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदानावरून आच्छादने (कव्हर्स) देखील हटवण्यात आली. सामना पुन्हा सुरू झाला आहे.
पाऊस थांबला असला तरी, खेळपट्टी अद्यापही आच्छादनाखाली आहे. मात्र, आनंदाची बातमी अशी की, सामना आता भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता षटकांमध्ये कपात करून पुन्हा सुरू होईल. प्रत्येक संघाचा डाव १८ षटकांचा असेल.
मैदान परिसरातील स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजता दिवे बंद करण्याची सक्ती असल्याचे समोर आले आहे. या नियमामुळेच, संपूर्ण २०-२० षटकांचा सामना खेळवता येणार नाही. खेळपट्टीवरील दिवे बंद करण्याची सक्ती असल्याने, वेळेचे हे बंधन निर्णायक ठरले असून, पूर्ण षटकांचा खेळ होऊ शकणार नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे थांबला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाच षटकांनंतर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात ४३ धावा केल्या. यावेळी भारताकडून सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर. अभिषेक शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. तो १९ धावांवर बाद झाला.
सूर्यकुमारने सामन्यातील पहिला षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. हेझलवूडने टाकलेला चेंडू यष्टीच्या दिशेने बॅक ऑफ अ लेन्थ होता. यावर सूर्यकुमार यादवने आपले टायमिंग अचूक साधले आणि मनगटाच्या जोरावर चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या सीमेवरून थेट प्रेक्षकांमध्ये पाठवले.
नॅथन एलीसने अभिषेक शर्माला बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. एलीसने टाकलेला स्लोअर चेंडू त्याच्यासाठी ट्रम्प कार्ड ठरला. गतीमधील अचानक बदल झाल्यामुळे अभिषेक शर्मा पूर्णपणे फसला. त्याने या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंगचा अंदाज चुकला आणि तो मिड-ऑफला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातता गेला. टिम डेव्हिडने कोणतीही चूक न करता हा सोपा झेल पूर्ण केला.अभिषेक शर्माची आक्रमक पण छोटी खेळी संपुष्टात आली. अभिषेक शर्माने १४ चेंडूत ४ चौकारांसह १९ धावा केल्या.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. डावखु-या अभिषेकने पहिल्यास षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला आणि चेंडू सीमापार पाठवला. त्यानंतर दुस-या षटकात अभिषेकने बार्लेटला दोन चौकार लगावले. तर तिस-या आणि चौथ्या षटकात गिल-अभिषेक यांनी दोन-दोन चौकार मारून हेजलवूड, नॅथन एलिस यांचा समाचार घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या संघाची खरी ताकद त्यांच्या पहिल्या चार फलंदाजांच्या फटकेबाजीमध्ये आहे. सलामीवीर हेडला भारताविरुद्ध खेळायला खूप आवडते आणि मिचेल मार्श वेगाने जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक बनत आहे. त्यांच्या पाठोपाठ जोश इंग्लिश आहे, ज्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना आपल्या गुणवत्तेची आणि सकारात्मक फटकेबाजीची झलक दाखवली होती. टिम डेव्हिडही मधल्या षटकांमध्ये वेगाने धावा करण्यात पटाईत आहे.
भारतीय संघ केवळ अभिषेक शर्मावर पूर्णपणे अवलंबून नसला तरी, या संघाला अजेय स्तरावर घेऊन जाण्यात त्याचे जे अमूल्य योगदान आहे, ते आशिया चषकातून स्पष्ट झाले आहे. तो प्रत्येक सामन्यात संघाला एक जलद आणि दमदार सुरुवात करून देतो आणि मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता त्याच्यात कायम असते. मात्र, त्याच्यासमोर जोश हेझलवूडचे मोठे आव्हान असेल. हेझलवूड सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून जवळपास त्याला खेळणे अशक्य आहे. अभिषेकला लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात तो पॉवरप्लेमध्ये दोन आणि कदाचित तीन षटके गोलंदाजी करेल. या लढतीचा निकाल सामन्याची दिशा निश्चित करेल.
भारतीय संघासाठी एक चिंताजनक बातमी आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर पडावे लागले आहे. ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान नितिशला मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. तो त्यातून सावरत आहे. दरम्यान, आता त्याला मानेचे स्नायू आखडल्याची तक्रार जाणवत आहे. या नव्या तक्रारीमुळे त्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेवर आणि हालचालींवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सध्या त्याच्या रिकव्हरीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. महत्त्वाच्या अष्टपैलू खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे उर्वरित सामन्यांसाठी संघाचा समतोल साधणे हे व्यवस्थापनासाठी एक कठीण आव्हान असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमारने या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड
टॉप ऑर्डरनंतर, मधली फळी जी उतरण्याची शक्यता आहे, त्यात आशिया चषक फायनलचा हिरो तिलक वर्मा (जो त्याची पहिली ऑस्ट्रेलियन मालिका खेळत आहे) आणि संजू सॅमसन यांचा समावेश असेल. तिलकची प्रतिभा पाहून व्यवस्थापन त्याला नेहमीच पाठिंबा देत आहे, परंतु संजू सॅमसनचे स्थान अनिश्चित असल्याचे समजते.
तिलक आणि सॅमसन या दोघांनी सुमारे १० महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील अशाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली होती. दोघांनी शतके ठोकली होती. चांगल्या खेळपट्ट्या आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. ऑस्ट्रेलियातही त्यांना याच प्रकारच्या खेळपट्ट्या मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते धोकादायक ठरू शकतात.
भारताला सर्वात महत्त्वाच्या खेळाडूची उणीव भासण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या जो समतोल आणि लवचिकता प्रदान करतो, त्याला कमी लेखता येणार नाही: तो स्वतःच तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळण्यास सक्षम आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याला ऑस्ट्रेलियात फलंदाजीचा खूप आनंद मिळाला आहे. दुखापतीमुळे तो खेळत नसल्याने, भारताला योग्य समतोल साधण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल. नितीश कुमार रेड्डी त्याची जागा घेण्यासाठी तयार असू शकतो, पण तसे न झाल्यास, पाहुण्या संघात या संपूर्ण मालिकेत त्यांच्या प्लेइंग-११ मध्ये एकतर गोलंदाज किंवा फलंदाज कमी असण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ आता फार दूर नाही. त्यामुळे भारताच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका अत्यंत महत्त्त्वाची आहे. या जागतिक स्पर्धेपूर्वी भारताला जवळपास १५ टी-२० सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संघाला जर सकारात्मक निकाल मिळाले, तर त्यामुळे संघाचे मनोबल उंचावेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमारच्या फॉर्मबद्दलच्या चिंता फेटाळून लावली आहे. मात्र, असे असले तरी सूर्यकुमारला लवकरच फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे.
बॅटने योगदान देण्यात अपयशी ठरला असला तरी, कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे रेकॉर्ड लक्षवेधी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत २९ पैकी २३ सामने जिंकले आहेत. या काळात संघाने आक्रमक फलंदाजी केली असून पहिल्या चेंडूपासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला चढवला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने अद्याप कोणतीही द्विपक्षीय टी-२० मालिका गमावलेली नाही आणि अलीकडेच पाकिस्तानला हरवून आशिया चषकाचे विजेतेपदही पटकावले आहे.
भारतीय संघ जवळपास या आधीच्याच म्हणजे आशिया चषकाचे विजेतेपद पटकावणा-या प्लेइंग-११ सह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारताकडे टी-२० चा एक मजबूत संघ आहे. संघाने मागील १० पैकी आठ सामने जिंकले असून केवळ एक गमावला आहे. एक टाय झाला आहे. दरम्यान, भारतीय संघासाठी आव्हान सोपे नसेल, कारण कांगारू संघ देखील फॉर्ममध्ये आहे. त्यांनीही भारताप्रमाणेच मागील १० पैकी आठ सामने जिंकले असून एकात पराभव पत्करला आहे, तर ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (दि. २९) कॅनबेरा येथे पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती, परंतु सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ हा सामना जिंकून टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करू इच्छितो.