

Who is Sakib Hussain SRH vs RR IPL 2026 highlights:
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या रणांगणात पुन्हा एकदा एका नवख्या खेळाडूने लक्ष वेधून घेतले आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या साकिब हुसेन या २१ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. साकिबने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अवघ्या २४ धावांत ४ बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या या भेदक माऱ्याच्या जोरावर हैदराबादने राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
पदार्पणाच्या सामन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा साकिब हा आयपीएल इतिहासातील सातवा गोलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह त्याने पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, पदार्पणात ४ बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने आता पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीत अल्झारी जोसेफ (६/१२) अव्वल स्थानी आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, हैदराबादच्या दोन नवख्या गोलंदाजांनी सामन्याचे चित्रच पालटून टाकले. साकिब हुसेन (४/२४) आणि प्रफुल्ल हिंगे (४/३४) या जोडीने राजस्थानच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडले. या दोघांच्या सांघिक कामगिरीमुळे हैदराबादला मोठा विजय साकारता आला.
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या साकिबचा इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने साकिबला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. यापूर्वी २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेतले होते, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. साकिबने २०२२-२३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारसाठी टी-२० पदार्पण केले होते. वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्याने २० धावांत ४ बळी घेण्याचा पराक्रम केला होता. २०२५-२६ च्या रणजी करंडकात अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ धावांत ६ बळी घेत त्याने आपली चुणूक दाखवली होती.