IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने ‘कॅप्टन’ बदलला; अभिषेक शर्माकडे मोठी जबाबदारी

Sunrisers Hyderabad Captain : फ्रँचायझीची 'एक्स'वरून मोठी घोषणा
IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादने ‘कॅप्टन’ बदलला; अभिषेक शर्माकडे मोठी जबाबदारी
Published on
Updated on

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२६ च्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपल्या नेतृत्वात मोठे बदल करत नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. स्फोटक फलंदाज ईशान किशन आता हैदराबादच्या ताफ्याचे नेतृत्व करणार असून, युवा खेळाडू अभिषेक शर्मा याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये ईशान किशनने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या याच बहारदार कामगिरीची दखल घेत फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे. 'एक्स'वर या निर्णयाची माहिती देताना हैदराबादने स्पष्ट केले की, दुखापतीमुळे नियमित कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत ईशान किशन संघाचे नेतृत्व करेल.

पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

गेल्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने हैदराबादचे यशस्वी नेतृत्व केले होते. मात्र, या हंगामाच्या सुरुवातीला तो उपलब्ध नसल्याने व्यवस्थापनाने ईशान किशनची निवड केली आहे. पॅट कमिन्स संघात परतताच पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल, तोपर्यंत ईशान आणि अभिषेक ही जोडी संघाची धुरा सांभाळेल.

उल्लेखनीय आहे की, ईशान किशन २०२४ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग होता. २०२५ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ११ कोटी ४० लाख रुपयांची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील केले होते. ईशानची आयपीएलमधील आकडेवारी प्रभावी असून, त्याने ११९ सामन्यांच्या ११२ डावांत २९.१० च्या सरासरीने आणि १३७.६४ च्या स्ट्राईक रेटने २९९८ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिला सामना 'आरसीबी' विरुद्ध

सनरायझर्स हैदराबाद आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर करणार आहे. त्यांचा पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध होईल. त्यानंतर संघ कोलकाता आणि लखनौ विरुद्ध भिडणार आहे.

हैदराबादचे सामने

  • २८ मार्च : विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (बंगळुरू)

  • २ एप्रिल : विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (कोलकाता)

  • ५ एप्रिल : विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद)

  • ११ एप्रिल : विरुद्ध पंजाब किंग्स (मुल्लानपूर, चंदीगड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news