

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात सलग पराभवांचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर आता एक मोठे संकट उभे ठाकले आहे. संघाचा अनुभवी फलंदाज आणि आधारस्तंभ रोहित शर्मा याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून, गुरुवारी, १६ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
रविवारी (दि. १२) वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाजी दरम्यान रोहितला ही दुखापत झाली. डावातील सहावे षटक सुरू असताना रोहितने त्रास जाणवू लागल्याने फिजिओची मदत घेतली. फिजिओशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर त्याने खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र रासीख सलामचा एक चेंडू खेळल्यानंतर त्याला अधिक वेदना होऊ लागल्या. अखेर १३ चेंडूंत १९ धावांवर असताना रोहितने 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही आणि या सामन्यात मुंबईला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या दुखापतीचे गांभीर्य तपासण्यासाठी त्याच्या विविध वैद्यकीय चाचण्या (स्कॅन्स) केल्या जाणार आहेत. या चाचण्यांच्या अहवालानंतरच तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असेल की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. अद्याप मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाकडून त्याच्या दुखापतीबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले नाही. सामन्यांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सहकारी खेळाडू शेर्फेन रदरफोर्डने सांगितले की, "त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास असावा असे वाटते, परंतु मी डगआउटमध्ये असल्याने मला त्याबाबत अधिकृत किंवा सविस्तर माहिती नाही."
यंदाच्या हंगामात रोहित शर्मा चांगल्या लयीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ७८ धावांची धडाकेबाज खेळी करत २२१ धावांचे लक्ष्य गाठण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत त्याने १३७ धावा केल्या आहेत. एकीकडे रोहितची वैयक्तिक कामगिरी समाधानकारक असली, तरी मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम खडतर ठरत आहे. चार सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकलेला मुंबईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला आहे.
दुसरीकडे, मुंबईचा पुढील प्रतिस्पर्धी असलेला पंजाब किंग्सचा संघ सात गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत रोहित शर्मासारखा अनुभवी खेळाडू संघात नसल्यास, मुंबई इंडियन्ससाठी पुनरागमन करणे मोठे आव्हान ठरेल. आता सर्वांचे लक्ष रोहितच्या मेडिकल रिपोर्टकडे लागले आहे.