

Australia test squad vs West Indies
सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 25 जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपला अंतिम अकरा जणांचा संघ जाहीर केला आहे. केन्सिंग्टन ओव्हल येथे होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. संघाचा प्रमुख फलंदाज मार्नस लॅबुशेनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा अंतिम अकरा जणांचा संघ जाहीर.
मार्नस लॅबुशेनला संघातून वगळले, तर स्टीव्ह स्मिथ दुखापतीमुळे बाहेर.
सॅम कॉन्स्टास आणि जोश इंग्लिस यांना संघात स्थान.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजासोबत सॅम कॉन्स्टास डावाची सुरुवात करेल. कॅमेरून ग्रीन पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथच्या जागी चौथ्या क्रमांकावर जोश इंग्लिसला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड आणि सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरी फलंदाजी करतील. कर्णधार पॅट कमिन्सने संघात चार प्रमुख गोलंदाजांना स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा स्वतः कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड सांभाळतील, तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी नॅथन लायनवर असेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिजचा संघ : क्रेग ब्रॅथवेट, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, ब्रँडन किंग, रोस्टन चेस (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, जायडन सील्स.
ऑस्ट्रेलियाने त्यांचा अखेरचा कसोटी सामना नुकताच लॉर्ड्सच्या मैदानावर द. आफ्रिकेविरुद्ध खेळला. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 चा अंतिम सामना होता, ज्यात ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या कसोटी मालिकेद्वारे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघ नव्या WTC पर्वाची सुरुवात करत आहेत. त्यामुळे या नव्या पर्वात त्यांची कामगिरी कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.