

तब्बल 113 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे क्रिकेटविश्वातील दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित मैदानावर कसोटी सामन्यात एकमेकांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही एक क्रिकेटरसिकांसाठी ऐतिहासिक पर्वणीच असणार आहे. निमित्त आहे, बुधवारपासून सुरू होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याचे. या महामुकाबल्यात दोन्ही संघ जगज्जेतेपदासाठी झुंझतील. ज्यामुळे चाहत्यांना एक अविस्मरणीय आणि रोमहर्षक लढत पहायला मिळणार आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या आव्हानात्मक प्रवासात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी आपापल्या कामगिरीत उल्लेखनीय सातत्य राखले आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तथापि, त्यांची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल काहीशी भिन्न राहिली. द. आफ्रिकेने आपल्या मायदेशातील अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवत 12 पैकी 8 कसोटी सामन्यांमध्ये विजयश्री खेचून आणली. यासह त्यांनी 69.44 इतकी विजयाची टक्केवारी मिळवली. दुसरीकडे, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने 19 सामन्यांमध्ये विविध प्रतिस्पर्धकांशी यशस्वीपणे दोन हात करत 67.54 च्या विजयी टक्केवारीची नोंद केली.
या शतकात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका अनेक अविस्मरणीय आणि तितक्याच वादग्रस्त क्षणांनी गाजले आहे. 2018 मधील ‘सँडपेपर गेट’ प्रकरण त्यांच्यातील तीव्र स्पर्धेची आणि कटुतेची आठवण करून देते, ज्यामुळे दोन्ही संघातील प्रत्येक सामन्याला एक वेगळीच धार चढलेली असते.
या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना तब्बल 113 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1912 साली खेळवला गेला होता. त्यावेळी, सध्याच्या डब्ल्यूटीसीच्या संकल्पनेशी बरेच साधर्म्य असलेल्या ‘तिरंगी मालिकेचे’ (Triangular Tournament 1912) आयोजन करण्यात आले होते. 20 व्या शतकाच्या प्रारंभी कसोटी क्रिकेट गाजवणाऱ्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तत्कालीन बलाढ्य संघांचा या मालिकेत समावेश होता. विशेष म्हणजे, दोनपेक्षा अधिक संघांचा सहभाग असलेली ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच कसोटी स्पर्धा होती. 1998 च्या आशियाई कसोटी चॅम्पियनशिपपर्यंत अशा स्वरूपाची ती एकमेव स्पर्धा ठरली.
मे ते ऑगस्ट 1912 दरम्यान खेळल्या गेलेल्या या नऊ सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक संघ एकमेकांशी तीन वेळा भिडला. स्पर्धेच्या एका महत्त्वपूर्ण आणि निर्णायक सामन्यात (तत्कालीन उपांत्यपूर्व फेरी) ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका लॉर्ड्सवर तीन दिवसीय कसोटी सामन्यात आमनेसामने आले. त्या सामन्यात, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव पहिल्याच दिवशी 263 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 390 धावांचा मजबूत पाया रचला. फ्रँक मिचेल यांच्या नेतृत्वाखालील प्रोटियाज संघाला दुसऱ्या डावात केवळ 173 धावाच करता आल्या, परिणामी ऑस्ट्रेलियाने तो सामना 10 गडी राखून सहज आपल्या नावे केला.
त्या मालिकेत हे दोन्ही संघ ट्रेंट ब्रिज येथे पुन्हा एकदा आमनेसामने आले. तो सामना मात्र अनिर्णित राहिला. तथापि, यजमान इंग्लंडने द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना मागे टाकत त्या ऐतिहासिक तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले. आश्चर्याची बाब म्हणजे, ती स्पर्धा त्यानंतर पुन्हा कधीही आयोजित केली गेली नाही.
113 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेचा संघ पॅट कमिन्सच्या विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध लॉर्ड्सच्या हिरवळीवर उतरेल तेव्हा 20 व्या शतकाच्या सुरुवातीला याच मैदानावर कोरल्या गेलेल्या त्यांच्या जुन्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा मिळेल. हा सामना केवळ एका विजेतेपदापुरता मर्यादित न राहता, क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासातील एक नवा सुवर्ण अध्याय ठरेल.