

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने 371 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लिश सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत केवळ 25 षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. या दरम्यान, बेन डकेटने आपले अर्धशतक पूर्ण करत हेडिंग्लेच्या मैदानावर एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे.
बेन डकेटने गेल्या 30 वर्षांत हेडिंग्ले कसोटीच्या दोन्ही डावांत 50 हून अधिक धावा करणारा केवळ दुसरा इंग्लिश सलामीवीर होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी 2015 मध्ये माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. डकेटने या सामन्याच्या पहिल्या डावात 62 धावांची खेळी केली होती आणि आता दुसऱ्या डावातही त्याने अर्धशतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.
बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावासाठी महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी रचली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर हेडिंग्लेच्या मैदानावर चौथ्या डावात 100 पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी झाली आहे. यापूर्वी 1984 मध्ये वेस्ट इंडिजचे दिग्गज सलामीवीर डेसमंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिज यांनी 106 धावांची भागीदारी केली होती.
दरम्यान, पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 30 षटकांत बिनबाद 117 धावा केल्या आहेत. बेन डकेट 64 धावांवर तर जॅक क्रॉली 42 धावांवर खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी अजूनही 254 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले असून, त्यांना अद्याप पहिल्या बळीची प्रतीक्षा आहे.