

West Indies allout on 27 runs in 3rd test 3rd day against Australia
सबिना पार्कवर तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ केवळ 27 धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. यासह ऑस्ट्रेलियाने 176 धावांनी मोठा विजय मिळवत मालिका 3-0 ने जिंकून निर्भेळ यश संपादन केले. तिसऱ्या दिवशी उपहारानंतर जे घडले, ती गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातील अविश्वसनीय घटना ठरली. मिचेल स्टार्कने सर्वात जलद म्हणजे अवघ्या 15 चेंडूंत पाच बळी मिळवले, तर स्कॉट बोलंडने हॅट्ट्रिक साधत आपल्या स्विंग आणि सीम गोलंदाजीच्या सनसनाटी स्पेलने यजमान विंडिज फलंदाजीचा पालापाचोळा केला.
सामन्यात सुरुवातीपासूनच आव्हानात्मक असलेल्या परिस्थितीत 204 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला कधीच सूर गवसला नाही. आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या स्टार्कने डावाच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेत कॅरेबियन संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने एकाच षटकात जॉन कॅम्पबेल, केव्हलॉन अँडरसन आणि ब्रँडन किंग यांना तंबूत पाठवले. यापैकी अँडरसन आणि किंग यांना काही कळायच्या आतच, स्टार्कचे दोन आग ओकणारे इनस्विंग चेंडू त्यांच्या बॅट आणि पॅडच्यामधून सुसाट निघून गेले आणि त्यांची दांडी गुल झाली.
शून्यावर 3 गडी बाद झाल्याने यजमान संघ आधीच मोठ्या संकटात सापडला होता, पण स्टार्कचा कहर अजून थांबला नव्हता. आपल्या तिसऱ्या षटकात त्याने मिकायल लुईसला पायचीत पकडून 400 कसोटी बळींचा टप्पा गाठल. यासह तो अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. दोन चेंडूंनंतर त्याने शाई होपला आणखी एका भेदक इनस्विंगरवर बाद केले.
त्यानंतर जोश हेझलवूडने रॉस्टन चेसचा बळी घेत विंडिजच्या पडझडीत भर घातली. यामुळे यजमान संघाची अवस्था 3 बाद 11 अशी झाली. दुहेरी धावसंख्या गाठणारा एकमेव वेस्ट इंडिज फलंदाज जस्टिन ग्रीव्ह्सने अल्झारी जोसेफच्या साथीने काही काळ खेळपट्टीवर तग धरला आणि चहापानापर्यंत डाव सावरला. पण चहापानानंतर, बोलंड सूत्रधार बनला.
चहापानानंतरच्या तीन चेंडूंच्या नाट्यमय स्पेलमध्ये बोलंडने ग्रीव्ह्सला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले, यशस्वी रिव्ह्यूनंतर शामार जोसेफला पायचीत पकडले आणि त्यानंतर जोमेल वॉरिकनला एका आत वळणाऱ्या आणि ऑफ स्टंपच्या वरच्या भागाला लागलेल्या चेंडूवर क्लिन बोल्ड केले. ही बोलंडची पहिली कसोटी हॅट्ट्रिक ठरली. यासह तो अशी कामगिरी करणारा कसोटी इतिहासातील 10वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला.
गलीमध्ये झालेल्या क्षेत्ररक्षणातील चुकीमुळे मिळालेल्या एका धावेमुळेच वेस्ट इंडिजने न्यूझीलंडच्या कसोटीतील सर्वात कमी 26 धावांच्या धावसंख्येची बरोबरी करणे टाळले. स्टार्कने पुन्हा गोलंदाजीला येत जेडन सील्सला बाद केले आणि 7.3 षटकांत 9 धावांत 6 बळी अशी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. वेस्ट इंडिजचा डाव केवळ 14.3 षटके आणि तासाभराहून थोडा अधिक काळ टिकला.
तत्पूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला परिस्थिती वेगळे वळण घेऊ शकली असती. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात 6 बाद 99 धावांपासून केली होती आणि त्यांच्याकडे 181 धावांची आघाडी होती, तर कॅमेरॉन ग्रीन 42 धावांवर खेळत होता. पण शामार जोसेफने सकाळच्या पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केले. हा एक उत्कृष्ट चेंडू होता जो आत वळून ऑफ स्टंपच्या वरच्या भागाला लागला. त्यानंतर अल्झारी जोसेफने शेपूट गुंडाळले आणि 27 धावांत 5 बळी घेतले. शामार आणि अल्झारी जोसेफ यांनी मिळून नऊ बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 121 धावांवर संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 225 धावा आणि दुसरा डाव 121 धावा (कॅमेरॉन ग्रीन 42, अल्झारी जोसेफ 27 धावांत 5 बळी)
वेस्ट इंडिज पहिला डाव 143 धावा आणि दुसरा डाव 27 धावा (मिचेल स्टार्क 9 धावांत 6 बळी, स्कॉट बोलंड 2 धावांत 3 बळी)
वास्तविक पाहता, वेस्ट इंडिज संघाच्या अव्वल सहा फलंदाजांना एकत्रितपणे धावफलकावर केवळ 6 धावाच जोडता आल्या. कोणत्याही कसोटी डावामध्ये अव्वल सहा फलंदाजांनी मिळून नोंदवलेली ही आजवरची सर्वात कमी धावसंख्या आहे.
यापूर्वी, हा लाजिरवाणा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी 1888 साली इंग्लंडविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळताना 12 धावा केल्या होत्या. तर, 20 व्या शतकाच्या प्रारंभापासूनची नीचांकी धावसंख्या वेस्ट इंडिजनेच 2000 साली मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 धावा करून नोंदवली होती.