

ind vs eng 4th test manchester test england squad announced
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने मंगळवारी (15 जुलै) आपल्या संघाची घोषणा केली. या संघात मोठे बदल करण्यात आले असून, फिरकीपटू शोएब बशीर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, तर सॅम कुक आणि जेमी ओव्हरटन यांना संघातून वगळण्यात आले आहे. बशीरच्या जागी लियाम डॉसन याची संघात निवड करण्यात आली आहे. त्याने तब्बल 8 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे.
35 वर्षीय डॉसन हा एक डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने इंग्लंडसाठी आपला अखेरचा कसोटी सामना जुलै 2017 मध्ये खेळला होता. तो आतापर्यंत इंग्लिश संघासाठी 3 कसोटी खेळला असून त्यात त्याला 84 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेता आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून तो हॅम्पशायरसाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून, 2023 आणि 2024 मध्ये त्याला ‘पीसीए प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले होते.
इंग्लंड निवड समिती सदस्य ल्यूक राइट म्हणाले, ‘लियाम डॉसन संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र आहे. कौंटी चॅम्पियनशिपमधील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे आणि तो हॅम्पशायरसाठी सातत्यपूर्ण खेळ करत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
डॉसनने 2016 मध्ये चेन्नई येथे भारताविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने नाबाद 66 धावांची खेळी केली होती. तसेव मुरली विजय आणि रवींद्र जडेजा यांचे बळीही घेतले होते. यानंतर, डॉसनने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्स आणि नॉटिंगहॅम येथे दोन कसोटी सामने खेळले. लॉर्ड्सच्या दोन्ही डावांमध्ये त्याने प्रत्येकी 2-2 असे एकूण 4 बळी मिळवले. तर नॉटिंगहॅममध्ये त्याने एका फलंदाजाला बाद करण्यात यश आले होते.
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स, लियाम डॉसन.