

Virat Kohli
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. २०२७ मध्ये होणारा वनडे विश्वचषक हा भारताकडून खेळणारा आपला अखेरचा विश्वचषक असेल, असे कोहलीने स्पष्ट केले. त्यामुळे २०२७ च्या विश्वचषकानंतर तो वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
JioStarशी बोलताना कोहलीने सांगितले की, परदेशातील परिस्थितीत खेळताना शरीरावर मोठा ताण येतो. त्यामुळे पुढील वनडे विश्वचषक आपल्यासाठी अखेरची संधी असल्याचे त्याने म्हटले. “भारतासाठी खेळणारा हा माझा शेवटचा विश्वचषक असेल. त्यामुळे मैदानावर माझ्याकडून सर्वस्व पणाला लावण्याची हीच माझी प्रेरणा आहे,” असे कोहली म्हणाला.
५० षटकांच्या विश्वचषकातील तीव्रता इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा अधिक असल्याचेही त्याने नमूद केले. टी-२० सामन्यांच्या पातळीवरील तीव्रता सलग दहा सामन्यांमध्ये कायम ठेवणे मोठे आव्हान असते. एका दिवसात जवळपास अडीच टी-२० सामन्यांइतका खेळ होत असल्याने मोठ्या स्पर्धेत ही तीव्रता कायम राखणे कठीण असल्याचे कोहलीने सांगितले.
२००८ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने २०११ मध्ये पहिल्यांदा विश्वचषकात सहभाग घेतला. पदार्पणाच्या विश्वचषकातच त्याने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकत आपली छाप पाडली. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ४९ चेंडूत ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच गौतम गंभीरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताने तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक उंचावला.
२०१५ च्या विश्वचषकात संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावत मोहिमेला सुरुवात केली. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळल्या गेलेल्या २०१९ च्या वनडे विश्वचषकात कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याने सलग पाच अर्धशतके झळकावली होती, जिथे भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला.
२०२१ मध्ये वनडे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीने २०२३ चा विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला. या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली; मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत कोहलीने विक्रमी फलंदाजी करत ११ सामन्यांत ७६५ धावा केल्या. त्याची सरासरी ९५.६२ इतकी होती. त्याच्या या कामगिरीत तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
२०२४ मध्ये भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. सध्या कोहली केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकानंतर या प्रकारातूनही निवृत्ती घेण्याचा त्याचा निर्णय असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोहलीची कारकीर्द सुरूच असून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून टी-२० क्रिकेट खेळत आहे.