पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली मंगळवारी सकाळी लंडनच्या रस्त्यांवर एकत्र दिसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
विराट कोहलीने हिरव्या रंगाचा स्वेटशर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तर अनुष्का लेगिंग्ज, टी-शर्ट, जॅकेट आणि कॅप अशा साध्या पोशाखात दिसली.
एका फोटोमध्ये विराट एका महिलेशी संवाद साधताना दिसत असून, त्याच्या हातात एका लहान मुलाची प्रॅम दिसत आहे. ही प्रॅम त्यांच्या मुलगा अकायची असल्याचे मानले जात आहे. मात्र, या कोणत्याही छायाचित्रात अकाय दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराट यांना अकायच्या डे नर्सरीबाहेर पाहण्यात आले. दोघेही फुटपाथवर उभे असताना त्यांचे फोटो काढण्यात आले.
एका छायाचित्रात कॅमेऱ्यांचे लक्ष आपल्याकडे असल्याने अनुष्का अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. कुटुंबासोबतच्या खासगी वेळेतही कॅमेरे असल्याने ती नाराज असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते.
अनुष्का आणि विराट यांनी सुरुवातीपासूनच त्यांची मुले वामिका आणि अकाय यांना प्रसिद्धीच्या झोतात येऊ न देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी अनेकदा केले आहे.
भारतातील सततच्या प्रसिद्धी आणि माध्यमांच्या लक्षापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी या दाम्पत्याने मुलांसह लंडनमध्ये वास्तव्यास जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.