

Vaibhav Sooryavanshi
नवी दिल्ली : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात डावखुरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. अवघ्या १५व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळवणारा तो भारताचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा तब्बल ३६ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये धडाकेबाज कामगिरी करत ७७६ धावा केल्या. तब्बल २३७.३० च्या स्ट्राइक रेटसह त्याने स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऑरेंज कॅपही पटकावली. विशेष म्हणजे, एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. यासाठी त्याने ख्रिस गेलचा दीर्घकाळ टिकून असलेला विक्रम मोडला. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघातील निवड जवळपास निश्चित मानली जात होती.
भारताचा संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर १ ते ११ जुलैदरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. वैभव सूर्यवंशीला या मालिकांमध्ये संधी मिळाल्यास तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा पुरुष क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे वयाच्या १६ वर्षे २०५ दिवसांत कसोटी पदार्पण केले होते. २६ जून रोजी आयर्लंड विरूद्ध बेलफास्ट येथे पहिला टी-२० सामना होणार आहे. यामध्ये सुर्यवंशीला संधी मिळाली तर सचिन तेंडुलकरपेक्षा सुमारे १ वर्ष आणि ११४ दिवस लहान वयात पदार्पण करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरणार आहे.
भारतीय टी-20 संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही सूर्यवंशीच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आगरकर म्हणाले, "इतक्या कमी वयात स्पर्धात्मक आणि दबावाच्या वातावरणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणे ही मोठी गोष्ट आहे. तो सामन्याचा चेहरामोहरा बदलू शकणारा खेळाडू आहे. त्याच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत." ते पुढे म्हणाले, "टी-20 क्रिकेटमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःची निवड निश्चित केली आहे."
निवड समितीने श्रेयस अय्यर यांची भारताच्या नव्या टी-२० कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतही ते संघाचे नेतृत्व करणार आहेत. टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे. मधल्या फळीतील फलंदाज टिळक वर्मा यांच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.