

Vaibhav Sooryavanshi Demigod Of Cricket : आयपीएल २०२६ च्या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. या धावांच्या पावसामध्ये राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील हात धुवून घेत आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे. तो देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल या सर्व प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याला लवकरात लवकर टीम इंडियात घ्या अशी जोरदार मागणी देखील होत आहे.
मात्र भारताचे माजी खेळाडू आणि माजी निवडसमिती अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी १५ वर्षाच्या वैभवची तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केली त्यामुळं सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. वैभव हे भारताचे भविष्य आहे असं ते म्हणाले.
श्रीकांत हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वैभव सूर्यवंशीबाबत देखील असेच बेधडक वक्तव्य केलं आहे. त्यांनी निवडसमितीला देखील विनंती केली आहे. ते म्हणाले, 'हा मुलगा वैभव सूर्यवंशी... विचार करा एखादा खेळाडू असे फटके मारतोय. हा मुलगा अद्वितीय आणि ब्रिलियंट आहे. अजित मी तुला सांगतो की तू त्याच्या निवड फास्ट ट्रॅक करावीस. पुढच्या मालिकेत तो खेळला पाहिजे.'
माजी निवडसमिती अध्यक्ष श्राकांत यांनी वैभव सूर्यवंशीबाबत आस्ते कदम ही भूमिका खोडून काढली. ते म्हणाले की हा मुलगा मोठ्या स्टेजसाठी तयार आहे. 'मला वाटतं की सूर्यवंशीला फास्ट ट्रॅक करायला हवं. त्याला वेळ द्या त्याला सातत्यानं संधी द्या.' असं श्रीकांत म्हणाले.
श्रीकांत यांनी या मुलाने यंदाच्या हंगामात दिग्गज गोलंदाजांची धुलाई केल्याचे सांगितले. ते म्हणाले, विचार करा पहिला चेंडू तो बुमराहला षटकार हाणतोय... तो समोर कोणता गोलंदाज आहे याची काळजी करत नाही. तो एक 'दिव्य बालक' आहे.
कृष्णमाचारी श्रीकांत यांनी वैभव सूर्यवंशीची क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी तुलना केली. 'मी ज्यावेळी १९८९ मध्ये कर्णधार झालो त्यावेळी देखील १६ वर्षाचा एक दिव्य बालक होता. तो म्हणजे सचिन तेंडुलकर. तो आता क्रिकेटचा देव आहे. त्याचप्रमाणे हा मुलगा देखील क्रिकेटचा 'देवतुल्य' व्यक्तीमत्व होऊ शकतो.' असं भूवया उंचावणारं वक्तव्य केलं.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने दखील राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला की, वैभव हे एक जबरदस्त टॅलेंट आहे. त्याचा बॅट फ्लो आणि रिदम आहे ते पाहता तो भारताचं भविष्य ठरू शकतो.'
वैभव सूर्यवंशीभोवती एक हाईप क्रिएट होत आहे मात्र तो आपल्या कामगिरीनं त्याला न्याय देखील देत आहे. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सहा सामन्यात २४६ धावा ठोकल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे २३६.५३ इतकं आहे. आता बुधवारी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील बुधवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.