ICC T20 World Cup 2026 Live Streaming : कोणत्या चॅनलवर दिसणार सामने? रेडिओवरही ऐकता येणार हिंदी-इंग्लिश कॉमेंट्री
मुंबई : संपूर्ण भारतात सध्या 'आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचा सलामीचा सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार असून, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता क्रिकेटप्रेमींना टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपसोबतच रेडिओवरही विश्वचषकाच्या थराराचा आनंद लुटता येणार आहे.
भारत आणि श्रीलंकेत रंगणार क्रिकेटचा महासंग्राम
७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित होणाऱ्या या महाकुंभात एकूण २० संघ एकूण ५५ लढतींमध्ये सहभागी होतील. भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भूषवत आहेत. आयसीसीने (ICC) या स्पर्धेच्या प्रसारणाचे सर्व तपशील जाहीर केले असून, चाहत्यांना टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि रेडिओ अशा तिन्ही माध्यमांतून सामने पाहता आणि ऐकता येणार आहेत.
भारतात थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
टीव्ही : भारतात या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर केले जाईल.
डिजिटल प्लॅटफॉर्म : मोबाईल आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी जिओ हॉटस्टार (JioStar App) ॲप आणि वेबसाइटवर सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
प्रादेशिक भाषांचा विशेष तडका
भारतीय चाहत्यांची गरज लक्षात घेऊन आयसीसीने अनेक प्रादेशिक भाषांमध्ये कॉमेंट्रीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक सामना हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच प्रमुख भाषांमध्ये प्रसारित होईल. जिओ हॉटस्टारवर बंगाली, भोजपुरी आणि हरियाणवी या भाषांचाही पर्याय असेल.
भारतीय संघाचे सर्व सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना मराठी तसेच 'इंडियन साइन लँग्वेज'मध्येही (भारतीय सांकेतिक भाषा) उपलब्ध असणार आहे.
मोबाईल वापरकर्त्यांसाठी विशेष फीचर्स
मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टारने 'व्हर्टिकल लाईव्ह फीड' (Vertical Live Feed) आणले आहे, जे हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. याशिवाय प्रेक्षकांना ३६० व्ह्यू आणि मल्टी-कॅम फिचरचाही लाभ घेता येईल. यामध्ये स्टंप कॅम, फिल्ड व्ह्यू आणि हिरो कॅम अशा विविध कोनांतून सामन्याचा थरार अनुभवता येईल. तसेच, PVR–INOX सोबत केलेल्या करारानुसार देशभरातील निवडक चित्रपटगृहांमध्येही सामन्यांचे थेट स्क्रीनिंग केले जाणार आहे.
आता रेडिओवरही गुंजणार कॉमेंट्री
डिजिटल युगातही रेडिओ श्रोत्यांसाठी आयसीसीने विशेष सोय केली आहे. भारतात 'ऑल इंडिया रेडिओ' (AIR) वर टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांची थेट हिंदी कॉमेंट्री प्रसारित केली जाईल. तसेच आयसीसीच्या अधिकृत मोबाईल ॲपवरून जागतिक स्तरावर इंग्रजी ऑडिओ फीड उपलब्ध असेल. तसेच युनायटेड किंगडममध्ये BBC तर ऑस्ट्रेलियात ABC आणि SEN या रेडिओ चॅनेल्सवर सामन्यांचे थेट धावते वर्णन ऐकायला मिळेल.

