

लंडन : लॉर्डस् क्रिकेटच्या नियमांमध्ये (लॉ ऑफ क्रिकेट) मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. 2017 च्या कोडनंतर तिसऱ्यांदा या नियमात सुधारणा करण्यात आली असून, याआधी 2019 आणि 2022 मध्ये बदल झाले होते. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी ‘आयसीसी’च्या क्रिकेट समितीकडेही हे बदल मंजुरीसाठी जाणार आहेत.
‘एमसीसी’ने 12.5.2 मध्ये मोठा बदल केला आहे. आता दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडली, तरी ती ओव्हर अपूर्ण राहणार नाही. ‘एमसीसी’च्या मते, आधीचा नियम फलंदाजी संघाला जास्त फायदा देणारा होता आणि सामन्यातील रंजकता कमी करत होता. नव्या नियमानुसार, परिस्थिती योग्य असल्यास शेवटची ओव्हर पूर्ण टाकली जाईल, जरी त्या ओव्हरमध्ये विकेट पडली तरी.
‘एमसीसी’ने आता वरिष्ठ क्लब क्रिकेटमध्ये लॅमिनेटेड बॅटस् वापरण्यास मान्यता दिली आहे. या बॅटस्मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांचे संयोजन असते. त्यामुळे खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. ‘एमसीसी’च्या संशोधनानुसार, लॅमिनेटेड बॅटस्मुळे कोणताही अतिरिक्त कामगिरीचा (परफॉर्मन्स) फायदा होत नाही. कोणत्या स्तरावर या बॅटस् वापरायच्या, याचा निर्णय संबंधित देशांच्या क्रिकेट मंडळांवर सोपवण्यात आला आहे.
हिट विकेट (लॉ35) बाबत दोन महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत. फलंदाजाने शॉट खेळल्यानंतर तो तोल सावरत असताना स्टंप्सवर पडला, तर तो हिट विकेट आऊट मानला जाईल. जरी चेंडू बराच वेळ आधी निघून गेला असला, तरी हा निर्णय कायम राहील. मात्र, तोल सावरताना फलंदाजाचा एखाद्या क्षेत्ररक्षकाशी अपघाती संपर्क होऊन स्टंप्स पडले, तर तो हिट विकेट आऊट ठरणार नाही.
लॉ 19.8 (ओव्हरथ्रो) मध्ये असलेली ‘अस्पष्ट’ व्याख्या ‘एमसीसी’ने काढून टाकली आहे. आता ओव्हरथ्रो म्हणजे स्पष्टपणे स्टंप्सकडे चेंडू फेकून धावा रोखण्याचा किंवा रनआऊटचा प्रयत्न. तर केवळ चेंडू अडवण्याचा किंवा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे पास करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड मानला जाईल.
आता चेंडू डेड घोषित करण्यासाठी तो फक्त गोलंदाज किंवा विकेटकीपरच्या हातात असणे आवश्यक नाही. तो कोणत्याही क्षेत्ररक्षकाच्या हातात, किंवा जमिनीवर स्थिर असला तरी पंच तो ‘फायनली सेटल्ड’ मानू शकतात. यामुळे पंचांना, विशेषतः चुरशीच्या सामन्यांच्या शेवटच्या चेंडूंवर अधिक निर्णयस्वातंत्र्य मिळणार आहे.
‘एमसीसी’च्या मते, हे बदल दोन तत्त्वांवर आधारित आहेत. आधुनिक क्रिकेटसाठी योग्य नियम आणि सर्व स्तरांवरील आणि सर्वांसाठी समावेशक क्रिकेट. ‘एमसीसी’चे लॉज मॅनेजर फ्रेझर स्टुअर्ट म्हणाले, ‘क्रिकेट सतत बदलत आहे. त्यामुळे 1787 पासून आम्ही ज्या नियमांचे व्यवस्थापन करतो, ते जगभरातील क्रिकेटसाठी अद्ययावत असणे आवश्यक आहे.’ एकंदरीत, 2026 पासून क्रिकेटच्या खेळात नियमांच्या पातळीवर मोठे बदल पाहायला मिळणार आहेत, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटवर होणार आहे.