

हैदराबाद : भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत युवराजच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने पुढे जात 32 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि 52 चेंडूंत 8 चौकार व तब्बल 16 षटकारांसह 148 धावांचाझंझावात साकारला. त्याच्या वादळी शतकामुळे पंजाबने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 310 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात बंगालला 9 बाद 198 धावांवर समाधान मानावे लागले.
या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर अभिषेक शर्माने आपला आदर्श युवराज सिंगशी बरोबरी केली. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून देताना इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारल्यामुळे युवराजची ती खेळी विशेष गाजली होती.
रविवारी हैदराबाद येथील जिमखाना मैदानावर बंगालविरुद्धच्या सामन्यात अभिषेकने पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये संयुक्त तिसरे सर्वात जलद अर्धशतक आणि भारतीयाने केलेले संयुक्त दुसरे सर्वात जलद अर्धशतक नोंदवले. अभिषेकच्या खात्यावरच या स्पर्धेतील सर्वात जलद शतकही नोंद आहे. त्याने मागील वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मेघालयविरुद्ध पंजाबकडून खेळताना 28 चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली होती.
पहिल्या विकेटसाठी अभिषेकने प्रभसिमरन सिंगसोबत 75 चेंडूंमध्ये 205 धावांची मोठी सलामी भागीदारी रचली. प्रभसिमरननेही 8 चौकार आणि 4 षटकार मारत केवळ 35 चेंडूंमध्ये 70 धावांची दमदार खेळी केली. अभिषेक बाद झाल्यानंतर रमणदीप सिंग (15 चेंडूंत 39) आणि सनवीर सिंग (8 चेंडूंत 22) यांनी काही महत्त्वपूर्ण छोटेखानी योगदान दिले. यामुळे पंजाबने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 310 धावांचा डोंगर उभा केला. ही धावसंख्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी आणि एकूण टी-20 क्रिकेटमधील चौथी सर्वात मोठी धावसंख्या आहे.
पंजाब : 20 षटकांत 5 बाद 310. (अभिषेक शर्मा 52 चेंडूंत 8 चौकार, 16 षटकारांसह 148, प्रभसिमरन सिंग 35 चेंडूंत 70 धावा. आकाश दीप 2/55).
बंगाल : 20 षटकांत 9 बाद 198 (अभिमन्यू ईश्वरन 66 चेंडूंत 13 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 130, आकाश दीप 31. हरप्रीत ब्रार 4/23)
अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी हा दिवस निराशाजनक ठरला, त्याने चार षटकांत 61 धावा दिल्या आणि एक गडी मिळवला. त्याच्याव्यतिरिक्त आकाश दीप (2/55) आणि ऋतिक चॅटर्जी (0/67) यांचे गोलंदाजी पृथक्करणही पंजाबच्या फलंदाजांनी बिघडून टाकले.