Cricket Record : ‘हिटमॅन’ रोहितच्या षटकारांचे वैविध्यपूर्ण विक्रम..!, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

रणजित गायकवाड

रोहित शर्माने केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली 'सिक्सर किंग' म्हणून ओळख मजबूत केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट :

रोहितने आतापर्यंत एकूण 645 षटकार मारले आहेत, जो कोणत्याही फलंदाजासाठी सर्वोच्च आकडा आहे. या बाबतीतही ख्रिस गेल (553) दुसऱ्या स्थानावर आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय :

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केलेल्या रोहितच्या नावावर या फॉरमॅटमध्येही सर्वाधिक 205 षटकार आहेत.

कसोटी क्रिकेट :

कसोटीतही त्याने 88 षटकार मारले आहेत, जो ऋषभ पंत (94) आणि वीरेंद्र सेहवाग (91) नंतर भारतीय फलंदाजांमध्ये तिसरा क्रमांक आहे.

वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा (126) आता महेंद्रसिंह धोनीच्या (126) बरोबरीने संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा इऑन मॉर्गन (147) अव्वल स्थानी आहे.

एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध :

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 93 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध 85 षटकार मारले आहेत.

2023 हे षटकारांचे वर्ष :

2023 मध्ये, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 67 षटकार मारले. हा एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही फलंदाजाने मारलेला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. यापूर्वी, एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 58 आणि ख्रिस गेलने 2019 मध्ये 56 षटकार मारले होते. विशेष म्हणजे ही सर्व विश्वचषकाचीच वर्षे होती.

भारतात खेळताना सर्वाधिक षटकार : रोहितने भारतात खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 182 षटकार मारले आहेत. आपल्या मायदेशात 100 हून अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल आहे.

विश्वचषकातील 'सिक्सर मशीन' :

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात रोहित शर्माने सर्वाधिक 54 षटकार मारले आहेत. गेल 49 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

2023 च्या विश्वचषकात भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात रोहितचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने एकाच स्पर्धेत विक्रमी 31 षटकार मारले. 2015 मधील गेलच्या 26 षटकारांचा विक्रम त्याने मोडला.

पुल/हुक शॉटचा वापर :

रोहितने मारलेल्या षटकारांपैकी तब्बल 140 षटकार 'पुल' किंवा 'हुक' शॉट्सद्वारे आले आहेत. वेगवान गोलंदाजांविरुद्ध 'पुल' शॉटने सर्वाधिक षटकार (112) मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

पॉवरप्लेमध्ये धडाका :

2023 पासून, एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या 10 षटकांमध्ये त्याने तब्बल 64 षटकार मारले आहेत, जो या काळात प्रतिस्पर्धकांपेक्षा खूप पुढे आहे.

आपल्या धडाकेबाज खेळीने आणि विक्रमी षटकारांनी रोहित शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्थान 'सिक्सर किंग' म्हणून पक्के केले आहे.