

rohit sharma new sixer king in odi cricket surpass shahid afridi
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटच्या (ODI) इतिहासात नवा अध्याय जोडला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) रांची येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) विश्वविक्रम धुळीस मिळवला. रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातला पहिला फलंदाज बनला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आफ्रिदीच्या नावावर होता, ज्याने आपल्या कारकिर्दीत ३५१ षटकार मारले होते. मात्र, रोहित शर्माने रांचीच्या मैदानात हा विक्रम मोडीत काढत 'सिक्सर किंग'चा नवा मुकुट परिधान केला आहे. रोहित शर्माच्या नावावर आता २७७ एकदिवसीय सामन्यांच्या २६९ डावांमध्ये ३५२ षटकार जमा झाले आहेत. यापूर्वी, शाहिद आफ्रिदीने ३९८ सामन्यांच्या ३६९ डावांमध्ये ३५१ षटकार मारले होते.
हा विक्रम मोडण्यासोबतच रोहित शर्माने आणखी एका दुर्मिळ विक्रमाला गवसणी घातली आहे. तो एकाच संघासाठी ३५० हून अधिक षटकार ठोकणारा जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहितने आपले सर्व ३५२ षटकार भारतासाठी खेळताना मारले आहेत. तर आफ्रिदीने ३५१ षटकारांपैकी ३४९ पाकिस्तानसाठी आणि २ षटकार आयसीसी (ICC) संघासाठी मारले होते. यावरून, रोहितचे भारतीय क्रिकेटसाठी असलेले महत्त्व आणि मोठे योगदान स्पष्ट होते.
रोहित शर्मा* : ३५२ षटकार (भारत)
शाहिद आफ्रिदी : ३५१ षटकार (पाकिस्तान)
ख्रिस गेल : ३३१ षटकार (वेस्ट इंडिज)
सनथ जयसूर्या : २७० षटकार (श्रीलंका)
एम.एस. धोनी : २२९ षटकार (भारत)
३५२* - रोहित शर्मा, भारत
३४९ - शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान
३३० - ख्रिस गेल, वेस्ट इंडिज
२६८ - सनथ जयसूर्या, श्रीलंका
२२२ - एमएस धोनी, भारत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यावर, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली. या अनुभवी जोडीने मैदानावर आपला दबदबा दाखवत झटपट शतकी भागीदारी पूर्ण केली.
विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 48 चेंडूंमध्ये षटकार मारून आपले 76 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर काही वेळातच, 'हिटमॅन' रोहित शर्मानेही 43 चेंडूंमध्ये आपले 60 वे एकदिवसीय अर्धशतक झळकावत, आपल्या विक्रमी खेळीला साजेशी फलंदाजी केली. या दोन्ही दिग्गज फलंदाजांच्या दमदार खेळीमुळे भारताचा डाव सावरला आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाण्यास मदत झाली.