

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा रोमांचक आणि अविश्वसनीय सामने पाहायला मिळतात. असाच एक सामना स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील टिटवुड मैदानावर सोमवारी (दि. 16) खेळला गेला. या टी-20 आंतरराष्ट्रीय सामनयत जे घडलं, ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. ट्राय-सीरिजमधील हा दुसरा सामना नेपाल आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला, ज्याने क्रिकेटप्रेमींना थक्क करून सोडले. या सामन्यात तब्बल तीन सुपर ओव्हर खेळवल्या गेल्या आणि या अभूतपूर्व थरारनाट्यात अखेर नेदरलँड्सने विजयश्री खेचून आणली.
सध्या स्कॉटलंड, नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांमध्ये टी-20 तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टिटवुड मैदानावर नेपाळ आणि नेदरलँड्स आमने सामने होते. नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावांचा संयमित पण आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तेजा निदामनुरू (35), विक्रमजीत सिंग (30) आणि साकिब झुल्फिकार (25) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नेपालच्या फिरकीपटूंनी, विशेषत: संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांनी, नेदरलँड्सला मोठा स्कोअर करण्यापासून रोखले. लामिछानेने 4 षटकांत केवळ 18 धावा देत 3 बळी घेतले.
प्रत्युत्तरात नेपाळनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित पौडेलने 48 धावांची दमदार खेळी केली. शेवटच्या षटकात नेपाळला विजयासाठी 16 धावांची गरज होती, पण संघ फक्त 15 धावा करू शकला. अखेरच्या चेंडूवर नंदन यादवने चौकार मारला ज्यामुळे सामना टाय झाला.
पहिली सुपर ओव्हर : रोमांचाची सुरुवात
निर्धारीत षटकांमधील सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरचा पर्याय निवडण्यात आला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपालने फलंदाजी करताना 19 धावा फटकावल्या, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. पण नेदरलँड्सनेही हार न मानता 19 धावाच केल्या आणि पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. क्रिकेटप्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत 17 धावा केल्या. नेपालला विजयासाठी 18 धावांची गरज होती, पण त्यांनीही 17 धावाच केल्या. यामुळे सामना पुन्हा एकदा टाय झाला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या सुपर ओव्हरनंतरही विजेता ठरला नाही. यामुळे सामना तिसऱ्या सुपर ओव्हरकडे वळला, ज्याने सर्वांना खिळवून ठेवले.
तिसरी सुपर ओव्हर : नेदरलँड्सचा ऐतिहासिक विजय
दोन सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर या सामन्याबद्दल चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेपालला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. पण त्यांनी हाराकिरी केली. नेपाळच्या संघाने एकही धाव न काढता दोन्ही विकेट गमावल्या. नेदरलँड्सच्या झॅक लॉयन कॅशेटने निर्णायक भूमिका बजावली. ज्यामुळे नेपालची धावसंख्या 2 बाद शून्य राहिली. अखेर नेदरलँड्सने केवळ 1 धावेचे लक्ष्य मायकेल लेव्हिटच्या पहिल्याच चेंडूवरील षटकाराच्या जोरावर आरामात गाठले आणि ऐतिहासिक विजय नोंदवला.
यापूर्वी, भारत विरुद्ध अफगाणिस्तान (2024) यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन सुपर ओव्हर्सचा सामना पाहायला मिळाला होता. पण तीन सुपर ओव्हर्सचा सामना हा पहिल्यांदाच खेळला गेला. हा सामना केवळ नेदरलँड्सच्या विजयासाठीच नव्हे, तर क्रिकेटच्या अनिश्चिततेसाठीही कायम स्मरणात राहील. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला, ज्याने टी-20 क्रिकेटच्या लोकप्रियतेची आणि रोमांचाची नवी परिभाषा लिहिली.