

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. पुरुष क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटमध्येही या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. अशातच दोन्ही संघ अगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत.
महिला वनडे विश्वचषक स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिली लढत भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. परंतु चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याची वाट पाहत आहेत. हा सामना 5 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.
गतविजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाची मोहीम 1 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ त्यांचा पुढचा सामना 8 ऑक्टोबर रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर कांगारू आणि इंग्लंड यांच्यातील सामना 22 ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये खेळला जाईल.
आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. त्यांचा पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध असेल. तर 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंडशी आणि 18 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला जाईल. यानंतर, 21 ऑक्टोबर रोजी द. आफ्रिकेशी आणि 24 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेशी सामना करेल.
महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये एकूण 28 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर तीन नॉकआउट सामने होतील. सर्व सामने बेंगळुरू, इंदूर, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम या भारतीय शहरांमध्ये होतील. त्याच वेळी, श्रीलंकेत खेळवले जाणारे सामने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. जर पाकिस्तान संघ बाद फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला तर पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होईल. जर त्यांचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला तर हा उपांत्य सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. त्यानुसार, अंतिम सामना देखील 2 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल.
भारत विरुद्ध श्रीलंका : 30 सप्टेंबर (बेंगळुरू)
भारत विरुद्ध पाकिस्तान : 5 ऑक्टोबर (कोलंबो)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 9 ऑक्टोबर (विशाखापट्टणम)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 12 ऑक्टोबर (विशाखापट्टणम)
भारत विरुद्ध इंग्लंड : 19 ऑक्टोबर (इंदूर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड : 23 ऑक्टोबर (गुवाहाटी)
भारत विरुद्ध बांगलादेश : 26 ऑक्टोबर (बेंगळुरू)