

ICC ready to back WTC four-day Tests | मागील काही वर्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. कसोटी क्रिकेटचा रोमांच द्विगुणीत करणार्या या स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी सर्वच संघ उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत आहेत. आता ही स्पर्धा अधिक थरारक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २०२७-२९ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेत लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता देण्याचा विचारात आहे; परंतु भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे संघ अपवाद असणार आहेत. याबाबत 'आयसीसी'चे अध्यक्ष जय शहा यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दैनिक 'द गार्डियन'ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात लॉर्ड्स येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी २०२७-२९ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चार दिवसांच्या कसोटी सामन्यांचे समर्थन केले. ICC अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ WTC सायकलसाठी अंतिम सामन्यादरम्यान यावर चर्चा केली. वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास टाळाटाळ करतात; परंतु चार दिवसांच्या क्रिकेटकडे वाटचाल केल्याने संपूर्ण तीन कसोटी मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात खेळता येईल. यासाठीचा नवा नियम बनवता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अजूनही अॅशेस, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी शुक्रवारी हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे.
२०१७ मध्ये आयसीसीने पहिल्यांदा द्विपक्षीय सामन्यांसाठी चार दिवसांच्या कसोटीला मान्यता दिली होती. २०१९ आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध चार दिवसांच्या कसोटीनंतर इंग्लंडने गेल्या महिन्यात ट्रेंट ब्रिज येथे झिम्बाब्वेसोबत चार दिवसांचा सामना खेळला होता.
रिपोर्टनुसार, 'चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमुळे एक दिवस कमी होईल. तसेच वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी एका दिवसातील खेळण्याचा वेळ दररोज किमान ९८ षटके टाकण्यात यावीत, असाही नियम करण्याचा विचार सुरु आहे. सध्याच्या पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात एका दिवसात जास्तीत जास्त ९० षटके टाकली जातात.
२०२५-२७ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मात्र, पाच दिवसांच्या सामन्यांच्या सध्याच्या स्वरूपानुसार सुरू राहील. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्याची सुरुवात होईल. २०२५-२७ या चक्रात सहभागी होणाऱ्या नऊ देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या २७ कसोटी मालिकांपैकी १७ मालिका या फक्त दोन सामन्यांच्या असतील तर सहा मालिका तीन सामन्यांची असेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे सर्व एकमेकांविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळतील.