

Ruturaj Gaikwad signs contract with Yorkshire
भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने इंग्लंडच्या प्रतिष्ठित काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये आपली नवी इनिंग सुरू करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्याने यॉर्कशायर संघासोबत करार केला असून, येत्या महिन्यात सुरू होणार्या चॅम्पियनशिप सामन्यात तो संघात दाखल होईल. त्याशिवाय, तो संपूर्ण हंगामात वन-डे कप स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
गायकवाड सध्या इंग्लंडमध्ये भारत ‘अ’ संघाच्या दौर्यावर आहे. मात्र, इंग्लंड लायन्सविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता.
‘आयपीएल’ सामन्यादरम्यान कोपराच्या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी 29 सामन्यांतून योगदान देणार्या गायकवाडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात शतके झळकावली आहेत, तर लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 16 शतके आहेत. गेल्या वर्षापासून तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे.
यॉर्कशायर संघात निवड झाल्यानंतर गायकवाडने आनंद व्यक्त केला. इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळवण्याचे नेहमीच माझे लक्ष्य होते आणि यॉर्कशायरसारख्या प्रतिष्ठित संघासोबत खेळण्याची संधी मिळणे हा अभिमानाचा विषय आहे. मला माहीत आहे की, हंगामातील हा टप्पा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि चॅम्पियनशिप तसेच वन-डे कपमध्ये चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन, असे तो म्हणाला.