

Vijay Hazare Trophy history: ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हंगामातील एक उत्कृष्ट खेळी केली. त्याने १३१ चेंडूत १३४ धावांची दमदार खेळी करत लिस्ट A क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडले आहेत. ऋतुराजने आपल्या खेळीदरम्यान संयम, टायमिंग आणि वर्चस्वाचा नमुना सादर केला. ऋतुराज हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
महाराष्ट्र विरूद्ध गोवा सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकत महाराष्ट्राच्याच अंकित बावणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्यांच्या यादीत आता ऋतुराज अव्वल स्थानावर आहे. त्याने ५७ डावात १५ शतकी खेळी केल्या आहेत. ९४ डावात १५ शतके ठोकणारा अंकित बावणे दुसऱ्या स्थानावर आहे. तर देवदत्त पडिक्कल (१३) आणि मयांक अग्रवाल (१३) हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
ऋतुराजने या शतकासोबतच अजूण एक भन्नाट विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋतुराज गायकवाड हा आता लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं २० शतके ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याने ९५ डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला १०० सामन्यांच्या आत २० शतके ठोकणे जमलेले नाही. यापूर्वी लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २० शतके ठोकण्याचा विक्रम मयांक अग्रवाल आणि खुर्रम मंझूर यांच्या नावावर होता. त्या दोघांनी १२९ डावात ही कामगिरी केली होती. तर विराट कोहली आणि बाबर आझम यांना लिस्ट A क्रिकेटमध्ये २० शतके ठोकण्यासाठी अनुक्रमे १४३ आणि १३१ सामने खेळावे लागले होते.
ऋतुराज गायकवाड - 58.83
मायकेल बेवन - 57.86
सॅम हैन - 57.76
विराट कोहली - 57.67
चेतेश्वर पुजारा - 57.01
महाराष्ट्र गोवा विरूद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऋतुराजनं आपल्या संयमी खेळीत ८ चौकार आणि सहा षटकार मारले. महाराष्ट्राने ७ बाद २४९ धावा केल्या होत्या. हा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. अखेर महाराष्ट्राने ३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यादरम्यान, ऋतुराज गायकडवानं अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. तो लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ५ हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला.
मात्र ऋतुराजचे देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड कितीही चांगले असले तरी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. न्यूझीलंडविरूद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत शतकी खेळी केली होती. ऋतुराज २९ वर्षाचा असून ही हा त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाचा काळ आहे.