

एकीकडे इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंलडचा केन विल्यमसन हे विराट कोहलीचे समकालीन खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. अशावेळी मला विराट कोहलीची आठवण येते.
Sanjay Manjrekar criticizes Virat Kohli
मुंबई : एकीकडे इंग्लंडचा जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम करत असताना मला विराट कोहलीची आठवण येते. विराट हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी पाच वर्ष खराब फॉर्मशी झुंजत होता; पण आपली कामगिरी का खालावली याचे कारण शोधण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला नाही. त्याने आपल्या तांत्रिक चुका सुधारण्यासाठी मेहनत घेण्याऐवजी कसोटी क्रिकेटमधून पळ काढला, अशी बोचरी टीका माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर बोलताना केली आहे.
विराटने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक मालिकेनंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्या मालिकेत त्याने १० डावांत केवळ १९४ धावा केल्या होत्या. कसोटीमधून निवृत्त झाला तरी त्याने केवळ एकदिवसीय (ODI) सामन्यांना प्राधान्य दिल्याने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, एकीकडे इंग्लंडचा जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंलडचा केन विल्यमसन हे विराट कोहलीचे समकालीन खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम करत आहे. अशावेळी मला विराट कोहलीची आठवण येते. दुर्दैव असे की, निवृत्तीपूर्वीची पाच वर्षे तो खराब फॉर्मशी झुंजत होता, पण आपल्या सरासरीमध्ये घसरण का होत आहे हे शोधण्यासाठी त्याने मनापासून प्रयत्न केले नाहीत."
'फॅब फोर' मधील महत्त्वाचा खेळाडू मानल्या जाणाऱ्या कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा करून निवृत्ती घेतली. कारकिर्दीच्या सुरुवातीला १० हजार धावांचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या कोहलीला ते पूर्ण करता आले नाही, ही बाब चाहत्यांच्या मनाला लागणारी आहे. सध्या विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचे डोंगर उभारत असला, तरी मांजरेकरांच्या मते त्याने कसोटीला दिलेले दुय्यम स्थान निराशाजनक आहे. "विराटने पूर्णपणे क्रिकेट सोडले असते तर समजू शकले असते, पण त्याने केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवले आहे. माझ्या मते, अव्वल फळीतील फलंदाजासाठी एकदिवसीय क्रिकेट हा सर्वात सोपा फॉरमॅट आहे," असे मांजरेकर यांनी नमूद केले.
२०२० ते २०२५ या काळात कोहलीची कसोटीतील कामगिरी खालावली होती. कोरोनापूर्व काळात ५० च्या सरासरीने खेळणाऱ्या कोहलीला जवळपास तीन वर्षे एकही शतक झळकावता आले नाही. विशेषतः ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद होण्याची त्याची कमकुवत बाजू शेवटपर्यंत कायम राहिली. ऑस्ट्रेलियातील शेवटच्या मालिकेत तो नऊ वेळा अशाच चेंडूंवर बाद झाला होता. यावर मांजरेकर म्हणाले की, "विराट कमालीचा फिट आहे. त्याने फॉर्ममध्ये परतण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळायला हवे होते, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये जाऊन सराव करायला हवा होता. त्याने दिलेली झुंज पाहून मला आनंद झाला असता. पण त्याने घेतलेला निर्णय वैयक्तिक असला तरी, कसोटी क्रिकेटसाठी त्याचे असलेले प्रेम पाहता, आज त्याची उणीव नक्कीच भासते."