R Ashwin IPL Retirement : आर. अश्विनच्या आयपीएल निवृत्तीमागे दडलंय रहस्य? लवकरच होणार मोठा खुलासा

अश्विन जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना दिसणार
r ashwin ipl retirement what secret behind his big decision
Published on
Updated on

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने बुधवारी (२७ ऑगस्ट) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधून अचानक निवृत्ती जाहीर केली. मात्र, या अनपेक्षित निर्णयानंतर त्याच्या निवृत्तीमागील खऱ्या कारणांविषयी चर्चांना उधाण आले आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबतचे मतभेद, त्याची यूट्यूब चॅनलवरील वक्तव्ये की त्याला ट्रेड करण्याच्या चर्चा, यापैकी नेमके कोणते कारण त्याच्या निवृत्तीला कारणीभूत ठरले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अश्विन येत्या काळात आपल्या यूट्यूब चॅनलवरून यावर प्रकाश टाकेल, अशी अपेक्षा आहे.

‘माझे वय झाले होते, सततचे दौरे आणि संघाबाहेर बसावे लागणे, हे मला खूप खटकत होते. संघात योगदान देण्याची माझी इच्छा नव्हती असे नाही, पण मग तुम्ही विचार करू लागता की घरी मुलांसोबत वेळ घालवणे अधिक योग्य आहे का? ती मोठी होत आहेत आणि मी इथे बसून काय करतोय? तेव्हा मला जाणवले की आता पुरे. वयाच्या ३४-३५ व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार माझ्या मनात नेहमीच होता. पण मधल्या काळात सातत्याने खेळायला न मिळाल्याने मी हा निर्णय घेतला.’ भारतीय संघाचा माजी स्टार फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीविषयी बोलता ही भावना व्यक्त केली होती.

r ashwin ipl retirement what secret behind his big decision
R Ashwin IPL retirement : फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची आयपीएलमधून निवृत्ती

आता अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या या दिग्गज ऑफ-स्पिनरने हेदेखील स्पष्ट केले आहे की, जगभरातील विविध लीगमध्ये खेळून नवनवीन अनुभव घेण्याचा त्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे.

सीएसकेमध्ये अश्विन नाराज होता का?

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स संघाविषयी आश्विनने केलेली वक्तव्ये, त्याचे यूट्यूब चॅनल आणि त्याला ट्रेड करण्याच्या चर्चा, ही त्याच्या आयपीएल निवृत्तीमागील कारणे तर नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या आयपीएल हंगामात अश्विनवर त्याच्या यूट्यूब चॅनलमुळे बरीच टीका झाली होती.

त्याचबरोबर, याच महिन्याच्या सुरुवातीला अशा बातम्याही आल्या होत्या की, अश्विनने २०२६ च्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून आपल्या संघातील स्थानाविषयी स्पष्टता मागितली होती. 'क्रिकइन्फो'च्या वृत्तानुसार, आयपीएल २०२६ मध्ये त्याचा संघात कसा वापर केला जाईल, याबद्दल त्याने विचारणा केली होती. जर तो संघाच्या योजनांमध्ये बसत नसेल, तर संघातून बाहेर पडण्यास आपली हरकत नाही, असेही अश्विनने सीएसके व्यवस्थापनाला कळवले होते.

r ashwin ipl retirement what secret behind his big decision
Surya Fitness Journey | दुखापत संकट नव्हे, तर पुनरागमनाची सर्वोत्तम संधी

इन्जुरी रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील करण्यात आलेल्या डेवाल्ड ब्रेविसच्या समावेशावरूनही अश्विनने विधान केले होते. यावर, सर्व नियमांचे पालन करूनच ब्रेविसला करारबद्ध करण्यात आले, असे सीएसकेने स्पष्ट केले होते. गुरजपनीत सिंगला २.२० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते आणि तो दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर तितकीच रक्कम ब्रेविसला देण्यात आली. वाद वाढल्यानंतर अश्विनने स्पष्टीकरण दिले होते की, त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीचा अर्थ काढण्यात आला.

सीएसकेने अश्विनला किती रुपयांना खरेदी केले?

अश्विनला गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात सीएसकेने ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. या हंगामात त्याने १४ पैकी केवळ ९ सामने खेळले. आठ वर्षांनंतर आपल्या शहराच्या संघात परतल्याने याला त्याची ‘घरवापसी’ मानले जात होते. मात्र, यंदाचा आयपीएल हंगाम अश्विनसाठी विशेष राहिला नाही. २००९ मधील पदार्पणाच्या हंगामानंतर पहिल्यांदाच त्याने १२ पेक्षा कमी सामने खेळले. तसेच, हा त्याचा सर्वात महागडा हंगाम ठरला, कारण त्याने प्रति षटक सरासरी ९.१२ धावा दिल्या, जे त्याच्या कारकिर्दीतील ८.४९ च्या इकॉनॉमी रेटपेक्षाही जास्त होते.

r ashwin ipl retirement what secret behind his big decision
‘ऑनलाइन गेमिंग कायद्या’मुळे Team India-Dream11 चा करार अखेर संपुष्टात! BCCIला किती ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

आयपीएल निवृत्तीच्या पोस्टमध्ये अश्विनने काय संकेत दिले?

३८ वर्षीय अश्विनने बुधवारी (२७ ऑगस्ट) सोशल मीडियावर आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक अंतासोबत एक नवी सुरुवात असते, असे म्हटले जाते. आयपीएल क्रिकेटपटू म्हणून माझा प्रवास आज संपत आहे, परंतु विविध लीगमध्ये खेळाचा माझा प्रवास आजपासून सुरू होत आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या शानदार आठवणी आणि नात्यांसाठी मी सर्व फ्रँचायझींचे आभार मानू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएल आणि बीसीसीआयने मला आतापर्यंत दिलेल्या सर्व गोष्टींसाठी मी त्यांचा ऋणी आहे. भविष्यात माझ्यासमोर जे काही येईल, त्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आणि संधीचे सोने करण्यासाठी मी उत्सुक आहे.’

r ashwin ipl retirement what secret behind his big decision
Cheteshwar Pujara Records : सचिन-द्रविडलाही जे जमलं नाही, ते पुजाराने करून दाखवलं! जाणून घ्या त्याचे अविश्वसनीय विक्रम

डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

१८ डिसेंबर २०२४ रोजी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गब्बा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तो आयपीएल खेळत राहणार असल्याचे त्याने सांगितले होते. आयपीएल २०२५ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला, जिथे त्याने ९ सामन्यांत ७ बळी घेतले आणि ३३ धावा केल्या. अश्विनने २२१ आयपीएल सामन्यांत १८७ बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ७.२० राहिला आहे. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ४/३४ अशी आहे. याशिवाय, ९८ डावांमध्ये त्याने ८३३ धावा केल्या असून, यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ५० आहे. अश्विन इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या पाच संघांकडून खेळला आहे. त्याने पंजाब संघाचे नेतृत्वही केले आहे.

आर. अश्विनची कारकीर्द (आकडेवारी)

कसोटी क्रिकेट :

  • गोलंदाजी : १०६ कसोटी, ५३७ बळी, ७/५९ सर्वोत्तम गोलंदाजी, २४.०० सरासरी

  • फलंदाजी : १०६ कसोटी, १५१ डाव, ३५०३ धावा, १२४ सर्वोच्च धावसंख्या, २५.७५ सरासरी

एकदिवसीय (ODI) क्रिकेट :

  • गोलंदाजी : ११६ सामने, १५६ बळी, ४/२५ सर्वोत्तम गोलंदाजी, ३३.२० सरासरी

  • फलंदाजी : ११६ सामने, ६३ डाव, ७०७ धावा, ६५ सर्वोच्च धावसंख्या, १६.४४ सरासरी

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट :

  • गोलंदाजी : ६५ सामने, ७२ बळी, ४/८ सर्वोत्तम गोलंदाजी, २३.२२ सरासरी

  • फलंदाजी : ६५ सामने, १९ डाव, १८४ धावा, ३१* सर्वोच्च, २६.२८ सरासरी

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अश्विन विविध विषयांवर नेहमीच आपली मते मांडत असतो. त्यामुळे, आयपीएलमधून निवृत्ती घेण्यामागील खऱ्या कारणांवरील मौन तो कधी सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच तो आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे या रहस्यावरून पडदा उठवेल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news