नवी दिल्ली: भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आज (दि. २७) आपल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. अश्विनने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन पाचव्या स्थानावर आहे.
निवृत्तीची घोषणा करताना अश्विनने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणाला, "आजचा दिवस खास आहे आणि त्यामुळे एक नवी सुरुवातही खास आहे. असे म्हणतात की प्रत्येक शेवट ही एका नव्या सुरुवातीची नांदी असते. एक आयपीएल खेळाडू म्हणून माझा प्रवास आज संपत आहे, परंतु जगभरातील विविध लीगमध्ये एक खेळाडू म्हणून नवनवीन गोष्टी शिकण्याचा माझा प्रवास आजपासून सुरू होत आहे. गेल्या अनेक वर्षांतील सुंदर आठवणी आणि नात्यांसाठी मी सर्व फ्रँचायझींचे आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयपीएल आणि बीसीसीआयने मला आजपर्यंत जे काही दिले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता भविष्यात येणाऱ्या संधींचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मी उत्सुक आहे."
रविचंद्रन अश्विनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण पाच संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. पंजाब संघाचे कर्णधारपदही त्याने भूषवले आहे. अश्विनने आयपीएल कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या पाच संघांचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन पाचव्या स्थानी आहे. त्याच्या पुढे युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सुनील नरेन आणि पियुष चावला आहेत. आपल्या यशस्वी आयपीएल कारकिर्दीत फिरकीपटूने २२१ सामने खेळले असून १८७ बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एका अर्धशतकासह ८३३ धावा केल्या आहेत.