

mohammed siraj leads team india s victory against england in oval test
शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपली पहिली कसोटी मालिका जवळपास यशस्वीरित्या पार पाडली आहे. ज्या मालिकेत प्रत्येक सामन्यात पराभवाचे सावट होते, त्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकण्यात यश मिळवले. भारतीय संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु या सर्वांमध्ये एक खेळाडू असा आहे, जो खऱ्या अर्थाने नायक ठरला. त्याने मालिकेतील पाचही सामने खेळले आणि इंग्लंडचा अखेरचा बळी घेत भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यात सिंहाचा वाटा उचलला.
द ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात, जेव्हा इंग्लंडला विजयासाठी केवळ ६ धावांची आवश्यकता होती, तेव्हा मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्यासमोर गस ऍटकिन्सन उभा होता. ऍटकिन्सन मूळतः एक गोलंदाज असला तरी, तो उत्तम फलंदाजीसाठीही ओळखला जातो. सर्वांना कल्पना होती की, ऍटकिन्सनने एक जरी मोठा फटका लगावला, तर सामना तिथेच संपला असता. परंतु, सिराजने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गस ऍटकिन्सनला यॉर्कर फेकला आणि त्यांच्या दांड्या गुल केल्या. यासह भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली. धावांच्या बाबतीत भारताने हा सर्वात कमी फरकाने मिळवलेला विजय ठरला आहे.
मोहम्मद सिराजने या सामन्यात १९० धावा देत एकूण ९ बळी मिळवले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिराजची सर्वात विशेष बाब म्हणजे, त्याने मालिकेतील पाचही सामने खेळले. त्याला ना विश्रांती देण्यात आली, ना त्याच्यासाठी 'वर्कलोड मॅनेजमेंट'चा (कार्यभाराचे व्यवस्थापन) विचार केला गेला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, तेव्हादेखील सिराजने पाचही सामने खेळले होते. म्हणजेच, भारताने खेळलेले मागील दहाही कसोटी सामने सिराज खेळला आहे आणि त्याने आपले सर्वस्व पणाला लावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सिराज या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने पाच सामन्यांच्या ९ डावांमध्ये २३ बळी आपल्या नावे केले. या दरम्यान सिराजने एकूण १८५.३ षटके (१११३ चेंडू) फेकली. यादरम्यान त्याची सरासरी ३२.४३ आणि स्ट्राइक रेट ४८.३९ राहिला. सिराज इतर गोलंदाजांपेक्षा किती पुढे होता, याचा अंदाज यावरून लावता येतो. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जोश टंग आहे, ज्याने तीन सामन्यांत १९ बळी घेतले. बुमराहने तीन सामन्यांत १४ बळी टिपले.
मोहम्मद सिराजने जून २००२ नंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजापेक्षा अधिक चेंडू टाकले आहेत.
सिराजने इंग्लंडमध्ये तब्बल सात वेळा एका डावात चार बळी मिळवण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आशियाई गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे. मुरलीधरनने इंग्लंडमध्ये सहा वेळा एका डावात चार बळी मिळवण्याची कामगिरी केली होती.
सिराजच्या नावावर आता इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४४ बळी जमा झाले आहेत. याबाबतीत त्याने टीम इंडियाचे माजी गोलंदाज कपिल देव (४३ बळी) यांना मागे टाकले. आता त्याच्या पुढे केवळ दोनच गोलंदाज आहेत.
इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह : ५१ बळी
ईशांत शर्मा : ५१ बळी
मोहम्मद सिराज : ४४ बळी
कपिल देव : ४३ बळी
मोहम्मद शमी : ४२ बळी