

Mohammed Siraj Believe ind vs eng cricket oval test day 5
लंडन : मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अँडरसन-तेंडुलकर चषक मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर अवघ्या ६ धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला. हॅरी ब्रूकचे झंझावाती आणि जो रूटची संयमी शतकी खेळी व्यर्थ ठरली. ओव्हलच्या मैदानावर 123 वर्षांतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचे इंग्लंडचे स्वप्न पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात धुळीस मिळाले. मोहम्मद सिराजने एका तासाच्या आत तीन महत्त्वपूर्ण बळी घेत कसोटी कारकिर्दीतील पाचवे पंचक पूर्ण केले आणि भारताला मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
ओव्हलच्या मैदानावर मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने एक अभुतपूर्व कामगिरी केली. त्याने पाच बळींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत भारताला ६ धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला. यासह मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यात यश आले. पाचव्या दिवशी, जेव्हा भारताला विजयासाठी चार बळींची आवश्यकता होती, तेव्हा सिराजने अत्यंत प्रभावी गोलंदाजी करत त्यापैकी तीन बळी मिळवले आणि इंग्लंडच्या तळातील फलंदाजीला खिंडार पाडले.
मात्र, या सामन्यातील सर्व काही सिराजसाठी सुरळीत नव्हते. चौथ्या दिवशी, सिराजने हॅरी ब्रूकचा महत्त्वपूर्ण झेल सोडला, जेव्हा ब्रूक १९ धावांवर खेळत होता. सीमारेषेजवळ झेल घेताना त्याचा पाय सीमारेषेला लागला आणि ब्रूकला जीवदान मिळाले. या संधीचा फायदा घेत इंग्लंडच्या फलंदाजाने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत शतक झळकावले.
झेल सोडल्याच्या निराशेनंतर सिराजने अपार जिद्द दाखवत जबरदस्त पुनरागमन केले आणि पाच बळींचा पराक्रम साकारला. विजय मिळवल्यानंतर सिराजने या प्रसंगावर भाष्य करताना सांगितले, ‘जेव्हा माझ्याकडून ती चूक झाली, तेव्हा वाटले की सामना हातातून निसटला आहे. जर तो झेल घेतला असता, तर सामन्याचा रंगच वेगळा असता. हा निर्णायक क्षण होता, पण आम्ही ज्या प्रकारे कमबॅक केले, ते कौतुकास्पद आहे. सकाळी उठल्यावर मी स्वतःला बजावले की, आज मी सामना बदलणार. मी ‘believe’ हा शब्द गुगल करून त्याचा इमोजी वॉलपेपरवर ठेवला,’ अशी भावना सिराजने सामना संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराशी संवाद साधताना व्यक्त केली.
पाचव्या दिवशीच्या पहिल्याच षटकात जेमी स्मिथला बाद करून सिराजने इंग्लंडवर दडपण आणले. त्यानंतर जेमी ओव्हरटनला बाद करत इंग्लंडच्या आशा धूसर केल्या आणि शेवटी गस अॅटकिन्सनला बाद करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सिराजने आपल्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण टप्पा आणि लेंथ राखण्याच्या रणनीतीला दिले. ‘योजना अशी होती की ऑफ-स्टंपबाहेर सातत्याने टप्पा आणि लेंथ राखायची. मी स्वतःला जास्त काही वेगळे करण्यास मनाई केली. जर मी वेगळे काही केले असते, तर प्रतिस्पर्ध्यांवरील दडपण कमी झाले असते. म्हणून मी सातत्यावर भर दिला,’ असे त्याने स्पष्ट केले.
३१ वर्षीय सिराजने संपूर्ण मालिकेत २३ बळी घेतले. तो मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. ‘पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत संपूर्ण संघाने ज्या प्रकारे झुंज दिली, त्याला सलाम. प्रत्येक सामना शेवटच्या दिवशी गेला आणि आम्ही ज्या प्रकारे लढलो, त्याचा भाग होणेच आनंददायक आहे,’ असे व्यक्त होताना सिराजने मालिकेतील भारतीय संघाच्या जिद्दीचे कौतुक केले. यावेळी त्याचे डोळे पाणावले होते.
भारताचे आव्हानात्मक लक्ष्य : भारताने आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालचे दमदार ११८ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या वेगवान ५३ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ३७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. ओव्हलच्या मैदानावर यापूर्वी कोणत्याही संघाने चौथ्या डावात इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. याआधी १९०२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने २६३ धावांचा पाठलाग करत एका गडी राखून विजय मिळवला होता.
ब्रूक आणि रूटची भागीदारी : ऑली पोपच्या नेतृत्वाखालील संघाने लक्ष्याच्या जवळ मजल मारली होती. ब्रूक आणि रूट यांनी आपल्या आक्रमक ‘बॅझबॉल’ शैलीत चौथ्या गड्यासाठी १९५ धावांची श्वास रोखून धरायला लावणारी भागीदारी केली आणि इंग्लंडला विक्रमी विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. ब्रूक बाद झाल्यानंतरही रूटने एकहाती किल्ला लढवत शतक झळकावले आणि भारताला १-३ अशा मालिका पराभवाच्या दिशेने ढकलले होते.
चौथ्या दिवशी नाट्यमय कलाटणी : मात्र, चौथ्या दिवशी चहापानानंतर सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. जखमी बेन स्टोक्सच्या जागी खेळणारा जेकब बेथेल ३१ चेंडू खेळूनही स्थिरावू शकला नाही. त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर एक अविचारी फटका खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्याच षटकात कृष्णाने शतकवीर जो रूटलाही तंबूत धाडले आणि भारताला सामन्यात परत आणले.
सिराजची निर्णायक गोलंदाजी : चौथ्या दिवशी सिराजने बेन डकेट आणि कर्णधार ऑली पोपला बाद करून इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला सुरुंग लावला होता. मात्र, हॅरी ब्रूकचा झेल सोडण्याची त्याची चूक भारताला महागात पडणार असे वाटत असतानाच, पाचव्या दिवशी त्याने केलेल्या अभूतपूर्व गोलंदाजीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आणि भारताला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.