

ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ धावांनी रोमहर्षक पराभव केला. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने मिळवलेला हा भारताचा सर्वात निसटता विजय ठरला आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे ४ गडी शिल्लक होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना कोणतीही संधी न देता सामना जिंकला.
या विजयासह पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या विजयामुळे भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेतही मोठा लाभ झाला आहे. भारतीय संघाने एका स्थानाची प्रगती करत तिसरे स्थान गाठले आहे, तर इंग्लंडची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
ओव्हल कसोटीपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर होता, परंतु आता दोन्ही संघांच्या स्थानांमध्ये अदलाबदल झाली आहे. भारताच्या खात्यात ५ सामन्यांमध्ये २ विजय, २ पराभव आणि १ अनिर्णित सामन्यासह २८ गुण जमा झाले आहेत. पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारताला १२ गुण प्राप्त झाले, ज्यामुळे त्यांचे गुण १६ वरून २८ झाले आहेत. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ४६.६७ आहे.
तर इंग्लंड संघाने आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये २ विजय आणि २ पराभव पत्करले आहेत, तर १ सामना अनिर्णित राहिला आहे. तथापि, आयसीसीने धीम्या गोलंदाजीच्या दरामुळे (स्लो ओव्हर रेट) दंड ठोठावला होता, त्यामुळे त्यांच्या खात्यात २६ गुण आहेत. इंग्लिश संघाची विजयाची टक्केवारी ४३.३३ आहे.
सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्रात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. न्यूझीलंडचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, परंतु ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नाही.
WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ अग्रस्थानी आहे, ज्यांची ३ सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी १०० आहे. दुसऱ्या स्थानावर ६६.६७ टक्के विजयांसह श्रीलंका संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. पाचव्या स्थानावर बांगलादेश असून, त्यांनी २ सामने खेळून १६.६७ टक्के विजय मिळवले आहेत. तर, ३ सामन्यांतील तीनही पराभवांमुळे वेस्ट इंडिजचा संघ सहाव्या स्थानावर आहे.