

कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या जो रूटने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो इंग्लंडसाठी चालू मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यावर त्याला रोखणे प्रतिस्पर्धी संघासाठी अत्यंत कठीण होऊन बसते. या सामन्यातही तो सध्या 36 धावांवर खेळत आहे.
पाचव्या कसोटी सामन्यात 25 धावा पूर्ण करताच जो रूटने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) 6000 धावांचा टप्पा ओलांडला. WTC मध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथने WTC मधील 55 सामन्यांमध्ये एकूण 4278 धावा केल्या आहेत.
जो रूट हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सुरुवातीपासूनच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत WTC मध्ये मिळवलेल्या 6000 धावांमध्ये खालील कामगिरीचा समावेश आहे.
एकूण सामने : 69
एकूण धावा : 6000+
शतके : 20
अर्धशतके : 22
सर्वोच्च धावसंख्या : 262
जो रूटने इंग्लंडसाठी 2012 साली नागपूर येथे भारताविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही आणि ते संघातून आत-बाहेर होत राहिले. मात्र, 2020 सालापासून त्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आणि त्यांची गणना कसोटीतील अव्वल फलंदाजांमध्ये होऊ लागली. मागील पाच वर्षांत त्यांनी जगभरातील खेळपट्ट्यांवर धावांचा पाऊस पाडला असून, ते प्रतिस्पर्धी संघांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत 158 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13,459 धावा केल्या आहेत, ज्यात 38 शतके आणि 66 अर्धशतकांचा समावेश आहे. ते इंग्लंडच्या फलंदाजीच्या फळीतील एक अविभाज्य आणि महत्त्वाचा दुवा बनले आहेत.