

Mohammad Siraj fined for breaching the ICC Code of Conduct
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दंडात्मक कारवाई केली आहे. रविवारी (दि. 13) लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटला बाद केल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन आक्रमकपणे जल्लोष केल्याप्रकरणी आयसीसीने ही शिक्षा सुनावली आहे. या कारवाईअंतर्गत सिराजच्या सामना शुल्कामधून 15 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.
लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी काही तास आधी, आयसीसीने ही कारवाई जाहीर केली. सिराजने इंग्लंडच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर हा दंड ठोठावण्यात आला आहे. यानुसार, सिराजच्या सामना शुल्कातून 15 टक्के कपात केली जाणार असून त्याच्या नावावर एका डिमेरिट गुणाचीही (demerit point) नोंद करण्यात आली आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिराज आयसीसीच्या आचारसंहितेच्या 'लेव्हल 1' च्या उल्लंघनासाठी दोषी आढळला आहे. खेळाडू आणि खेळाडूंच्या साहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे त्याने उल्लंघन केले. या कलमांतर्गत, ‘एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यावर त्याच्या दिशेने अपमानास्पद भाषा, कृती किंवा हावभाव करणे, किंवा फलंदाजाला आक्रमक प्रतिक्रियेसाठी प्रवृत्त करणे,’ या कृतींचा समावेश होतो.
या दंडात्मक कारवाईसोबतच, सिराजच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये एका डिमेरिट गुणाची भर पडली आहे. गेल्या 24 महिन्यांच्या कालावधीतील हा त्याचा दुसरा गुन्हा असून, यामुळे त्याच्या एकूण डिमेरिट गुणांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी 7 डिसेंबर 2024 रोजी ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजला पहिला डिमेरिट गुण मिळाला होता.
रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी सलामीवीर बेन डकेटला बाद केल्यानंतर सिराजने त्याच्या जवळ जाऊन अतिशय आक्रमकपणे जल्लोष साजरा केला होता. सिराजने आपली चूक मान्य केल्यामुळे या प्रकरणी आता कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, जर 24 महिन्यांच्या कालावधीत खेळाडूच्या खात्यात चार डिमेरिट गुण जमा झाले, तर त्याच्यावर एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-20 सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.