

मोहम्मद सिराजने बेन डकेटला 12 धावांवर बाद केले आणि त्यानंतर आक्रमक निरोप देत आदल्या दिवशीच्या वादाला पुन्हा तोंड फोडले. सिराजच्या या आक्रमक जल्लोषामुळे मैदानातील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी स्क्वेअर लेगवरून धाव घेत या भारतीय वेगवान गोलंदाजालाच्या प्रतिक्रियेबद्दल ताकीद दिली.
ही विकेट इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात मिळाली. सिराजने 140 किमी प्रति तास वेगाने ऑफ-स्टंपच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. डकेटने तो खाली खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला पुरेशी ताकद किंवा दिशा देता आली नाही आणि चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून थेट मिड-ऑनवर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहकडे गेला. बुमराहने झेल पूर्ण करताच, सिराज डकेटच्या दिशेने धावला. तो डकेटच्या अगदी जवळ जाऊन जल्लोषात ओरडला. पंचांनी हस्तक्षेप करण्यापूर्वी त्याने खांद्याने इशारा केल्याचेही स्पष्ट दिसले.
या जल्लोषामुळे तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण पुन्हा उफाळल्याचे चित्र आहे. शनिवारी खेळ संपताना शुभमन गिल आणि झॅक क्रॉली यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. तेव्हा क्रॉलीने फिजिओला बोलावल्यानंतर भारतीय संघाने उपरोधिकपणे टाळ्या वाजवल्या होत्या. त्या घटनेचा शेवट खेळाडूंमधील बाचाबाचीने झाला होता. तर आता रविवारी सामन्याच्या निर्णायाक चौथ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात सिराजच्या प्रतिक्रियेने दोन्ही संघांमधील मैदानावरचा तणाव आणखी वाढवला आहे.
त्याच षटकात डकेटने सुरुवातीला एक धाडसी लॅप शॉट खेळून आपला इरादा स्पष्ट केला होता, परंतु सिराजला पुन्हा एकदा जोखमीचा पुल शॉट खेळण्याचा त्याचा निर्णय महागात पडला. या विकेटमुळे इंग्लंडची धावसंख्या 1 बाद 22 झाली.
उपहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात बेन स्टोक्सने जसप्रीत बुमराहचा यशस्वीपणे सामना केला. मात्र, खेळाडू मैदानाबाहेर जात असताना शुभमन गिल आणि एकूणच भारतीय संघाच्या देहबोलीतून आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. भारताच्या दृष्टीने, या दोन दिवसांच्या निर्णायक लढतीची ही एक स्वप्नवत सुरुवात आहे, कारण त्यांनी इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले आहे. तथापि, जो रूट अद्याप खेळपट्टीवर असून चांगल्या लयीत दिसत आहे आणि त्याला साथ देण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सही मैदानावर आहे. जेमी स्मिथ अद्याप फलंदाजीसाठी यायचा आहे. विश्रांतीच्या काळात इंग्लंडला आपल्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे, परंतु सद्यस्थितीत भारताचे पारडे जड आहे.
तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकादरम्यान दोन्ही संघांमधील तणाव आधीच उफाळून आला होता. बुमराहच्या नव्या चेंडूवरील पहिल्या षटकात क्रॉलीने वारंवार खेळ थांबवल्याने भारतीय गोटात स्पष्ट नाराजी दिसून आली.
हातावर चेंडू आदळल्यानंतर क्रॉलीने फिजिओला बोलावले, ज्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी उपरोधिकपणे टाळ्या वाजवल्या. याआधीही क्रॉलीने साइट-स्क्रीनच्या समस्येचे कारण देत बुमराहला त्याच्या धावण्याच्या मार्गात दोनदा थांबवून षटक लांबवले होते.
गिल विशेषतः आक्रमक दिसत होता आणि त्याने स्लिपमधून फलंदाजाच्या दिशेने शाब्दिक टीकाही केली. क्रॉलीने फिजिओला बोलावल्यानंतर गिलने इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमकडेही इशारा केला. डकेटने यात हस्तक्षेप केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे खेळाडू तणावपूर्ण शाब्दिक चकमकीत सामील झाले आणि प्रकरण अधिकच चिघळले.