

2020-21 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे सध्या कसोटी संघात निवड समितीच्या योजनेबाहेर आहे. तथापि, या उजव्या हाताच्या फलंदाजाने पुनरागमनाची आशा सोडलेली नाही आणि संघात स्थान मिळवण्यासाठी तो कठोर मेहनत घेत आहे. नुकतेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रहाणे उपस्थित होता, आणि तेथेच त्याने राष्ट्रीय संघात परतण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेबद्दल भाष्य केले.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केलेल्या रहाणेने इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल अथर्टन आणि नासिर हुसैन यांच्याशी संवाद साधला. आपण स्वतःला भविष्यात कुठे पाहता, असे विचारले असता, त्याने पुनरागमनाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम असल्याचे तात्काळ उत्तर दिले.
भारतासाठी 85 कसोटी सामने खेळलेल्या या फलंदाजाने असा खुलासा केला की, सध्याच्या परिस्थितीत आपले स्थान काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याने निवड समितीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या गोष्टीमुळे तो विचलित झालेला नाही आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी करण्यावर त्याचे लक्ष केंद्रित आहे.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. माझ्या मनात कसोटी क्रिकेटविषयी प्रचंड आवड आहे. सध्या मी माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. मी येथे काही दिवसांसाठी आलो असून, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सरावाचे कपडे सोबत आणले आहेत. आमचा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होणार असून त्याच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे.’
रहाणे पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी, नियंत्रित करता येण्याजोग्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. खरे सांगायचे तर, मी निवडकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी खेळाडू म्हणून माझ्या नियंत्रणात नसतात. मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एक खेळाडू म्हणून मी फक्त क्रिकेट खेळत राहू शकतो, खेळाचा आनंद घेऊ शकतो आणि प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.’
रहाणेने आपला अखेरचा कसोटी सामना 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. त्याला कसोटी संघातून बाहेर होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या 37 वर्षीय खेळाडूने सांगितले की, त्याला खेळाचे सर्वात मोठे स्वरूप (कसोटी) खेळायला आवडते, कारण ती एका क्रिकेटपटूच्या चारित्र्याची अंतिम परीक्षा असते.
‘मला कसोटी क्रिकेट खेळायला आवडते, लाल चेंडूने खेळायला आवडते. ही खेळाबद्दलची आवड आणि प्रेमच मला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करते,’ असे तो म्हणाला.
रहाणेने 85 कसोटी सामन्यांमध्ये 38.46 च्या सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत.
रहाणेने सहा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले आहे. त्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. डिसेंबर 2020 मध्ये टीम इंडियाचा तत्कालीन कर्नधार विराट कोहली पितृत्व रजेमुळे मायदेशी परतल्यानंतर रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावांवर सर्व संघ गारद झाल्यानंतर भारतावर प्रचंड दडपण होते. तथापि, रहाणेने संघाचे उत्कृष्ट नेतृत्व करत पाहुण्या संघाला 2-1 असा संस्मरणीय विजय मिळवून दिला.