

mayank yadav ruled out of ipl 2025 william o rourke replacement
मुंबई : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आयपीएल 2025 पुन्हा सुरू होण्यास सज्ज आहे. ही स्पर्धा शनिवारपासून (17 मे) सुरू होणार आहे. दरम्यान, लीग सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुन्हा एकदा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओ'रोर्क याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आयपीएलच्या गेल्या हंगामात मयंक यादवच्या वेगाचे खूप कौतुक झाले होते. गेल्या हंगामातील कामगिरीच्या जोरावर, त्याने टीम इंडियासाठी पदार्पणही केले. पण आता या युवा वेगवान गोलंदाजाची कारकीर्द थांबताना दिसतेय. कारण दुखापत काही केल्या मयंकची पाठ सोडत नाहीय. तो सतत जायबंदी होत आहे. ज्यामुळे त्याच्यावर संघातून बाहेर पदण्याची नामुष्की ओढवली जात आहे. गेल्यावेळीही तो फक्त 4 सामने खेळून स्पर्धेबाहेर पडला आणि आताही तीच वेळ त्याच्यावर आली आहे.
यंदाच्या हंगामात मयंकला पाठदुखीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागले. या वेगवान गोलंदाजाला हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकावे लागले. पायाच्या आणि पाठीच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर त्याने पुनरागमन केले. त्यानंतर तो फक्त दोन सामने खेळला. ज्यामध्ये त्याने आठ षटके फेकून 12.50 च्या इकॉनॉमी रेटने 100 धावा दिल्या आणि फक्त दोन विकेट घेतल्या. मयंकला वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या हंगामात मयंकचा वेग किमान 15 किमी प्रतितासने कमी झाला आहे आणि त्याच्या गोलंदाजीच्या ॲक़्शनमध्येही बदल झाला आहे. एका वर्षात त्याला तीन वेळा पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहिला ब्रेकडाउन झाला आणि त्यानंतर तो सहा महिने बाहेर होता.
दरम्यान, एलएसजीने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी दुखापतग्रस्त मयंकच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओ'रोर्कचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. या किवी वेगवान गोलंदाजाला एलएसजीने 3 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. ओ'रोर्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
एलएसजी 11 सामन्यांतून 10 गुणांसह सातव्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, त्यांना त्यांचे उर्वरित सर्व लीग सामने जिंकावे लागणार आहेत.