

ipl 2025 Delhi Capitals controversy hashtag boycottdelhicapitals trending
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चे उर्वरित सामने 17 मे पासून खेळवले जाणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर जवळजवळ एका आठवड्यानंतर लीग पुन्हा सुरू होत आहे. पण अनेक विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत मायदेश गाठला आहे. परिणामी अनेक संघांना पर्यायी खेळाडूंची निवड करावी लागली आहे. यात दिल्ली कॅपिटल्सचाही समावेश आहे. या डीसी फ्रँचायझीने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला करारबद्ध केले आहे. या निवडीचा फ्रँचायझीला फटका बसला आहे. सोशल मीडियावर डीसीविरुद्ध #BoycottDelhiCapitals हा ट्रेंड सुरू झाला आहे.
डीसी फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या जागी बांगला देशचा गोलंदाज मुस्तफिजूरचा संघात समावेश केला आहे. फ्रँचायझीने बुधवारी (दि. 15) याची अधिकृत घोषणा केली. यानंतर, बांगलादेशी खेळाडूला संघात समाविष्ट करण्याच्या डीसीच्या निर्णयावर चाहते संतापले आहेत.
खरंतर, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात बांगलादेशने पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि अशा परिस्थितीत डीसीने मुस्तफिजूरला संघात समावेश करून घेणे ही देशविरोधी कृती आहे.
मुस्तफिजूरला करारबद्ध केल्यापासून डीसी फ्रँचायझीवर सोशल मीडियावरून सातत्याने टीका होत आहे. अनेक चाहते आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत आणि बॉयकॉट दिल्ली कॅपिटल्स सारख्या हॅशटॅगद्वारे त्यांची निराशा व्यक्त करत आहेत. काही वापरकर्त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला थेट ‘देशद्रोही संघ’ म्हणत जहरी टीका केली आहे.
डीसीविरुद्ध वातावरण तापले असतानाच मुस्तफिजूरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलंय की, तो यूएई विरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत (17 आणि 19 मे) खेळणार आहे. अशा परिस्थितीत मुस्तफिजूर आयपीएलमध्ये खेळू शकतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.
डीसीने आतापर्यंत 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. हा संघ प्लेऑफचा दावेदार आहे. पण त्यांना अजून अधिकृतरित्या स्थान मिळालेले नाही.